अहमदनगर : भागानगरे हत्याकांडातील आरोपींना ‘एलसीबी’च्या पथकाने घेतले ताब्यात | पुढारी

अहमदनगर : भागानगरे हत्याकांडातील आरोपींना 'एलसीबी'च्या पथकाने घेतले ताब्यात

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : अवैध धंद्याची तक्रार दिल्याच्या कारणावरून ओंकार ऊर्फ गामा भागानगरे या तरुणाची १९ जून ला रात्री तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना घडल्यानंतर तिन्ही हल्लेखोर नगरमधून पसार झाले होते. दरम्यान, २३ जून ला पहाटे गणेश केराप्पा हुच्चे आणि नंदू बोराटे या दोघांना एलसीबीच्या पथकाने पुणे रेल्वेस्थानक येथून ताब्यात घेतले, तर तिसरा आरोपी संदीप गुडा याच्याही लवकरच मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.

भागानगरे या तरुणाच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. मयत ओंकार भागानगरे आणि ओंकार घोलप यांनी अवैध धंद्यांची तक्रार केल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात हुच्चे, भागानगरे, घोलप यांच्यात वाद झाले. हुच्चे याने पोलिसांसमोरच घोलप व भागानगरे या दोघांना धमकी दिली होती. त्यानंतर सुमारे आठ ते नऊ तासांनी रात्री एक वाजता बालिकाश्रम रस्त्यावर ओंकार भागानगरे, ओंकार घोलप, शुभम पडोळे, आदित्य खरमाळे यांच्यावर तलवारीने खुनी हल्ला झाला.

तिघांनी केलेल्या हल्ल्यात ओंकार भागानगरे यांचा खून झाला होता. तर, शुभम पडोळे गंभीर जखमी झाला. ओंकार घोलप यांच्या फिर्यादीवरून गणेश हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा या तिघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हल्यानंतर आरोपींनी मोबाईल ‘स्विचऑफ’ करून नगरमधून पळ काढला होता. अखेर आरोपी गणेश हुच्चे, बोराटे यांना एलसीबीने शुक्रवारी पहाटे अटक केली आहे.

पुण्यातून पसार होण्याआधीच आवळल्या मुसक्या

भागानगरे याचा खून केल्यानंतर आरोपींनी नगरमध्येच मोबाईल बंद केले. त्यामुळे पोलिसांनाही आरोपींचे लोकेशन काढण्यात अडथळे येत होते. त्यामुळे ‘फिजिकल इन्वेस्टीगेशन’वर भर देत एलसीबीच्या पथकाने तपास सुरू ठेवला. हल्लेखोर सुरुवातीला शनिशिंगणापूर येथे काही काळ थांबले. तेथून छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नाशिक येथे गेले. नाशिकनंतर पनवेल, मुंबई असा प्रवास करून पुण्यात पोहोचले. आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने रेल्वे स्थानकावरून दोघांच्या मुसक्या आवळल्या.

‘एलसीबी’च्या दोन पथकांकडून तपास

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीची दोन पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी नियुक्त करण्यात आली होती. एलसीबीतील तीन अधिकाऱ्यांसह १२ पोलिस कर्मचारी या पथकात होते. एलसीबीनेच हल्लेखोरांना गुन्ह्यात मदत करणाऱ्या तीन जणांना अटक केली होती.

हेही वाचा

सांगलीत ईडीकडून छापेमारी; त्रिकोणी बाग परिसरात झाडाझडती

मान्सून रत्नागिरीतच, पुढे जाता जाईना ! तळकोकणात 11 दिवस अडखळला

पुण्यात पत्रकाराच्या खुनाचा कट उघड ; स्वारगेट पोलिसांकडून आरोपींना अटक

Back to top button