

मिरजगाव; पुढारी वृत्तसेवा : मिरजगावला पाणीपुरवठा करणार्या मुख्य योजनेवर ज्योतिबावाडी शिवारात अनिश इन्फ्राकॉन इंडिया प्रा. लि. या कंपनीने बोगस नळ कनेक्शन घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी व कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अनिश इन्फ्राकॉन इंडिया प्रा. लि. या कंपनीने अहमदनगर-सोलापूर या महामार्गाचे रुंदीकरण, खडीकरण, डांबरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम घेतले आहे.
श्री क्षेत्र मांदळीजवळील ज्योतिबावाडी शिवारात त्यांचे कार्यालय व निवासस्थाने आहेत. येथील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ज्योतिबावाडी शिवारात मिरजगाव शहराला पाणीपुरवठा करणार्या योजनेवरून बेकायदा दोन इंची कनेक्शन घेतले आहे, शिवाय गेल्या दोन वर्षांपासून हे कनेक्शन चोवीस तास सुरू आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत आहे. मिरजगाव शहरातील ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा होत नाही; मात्र ही कंपनी निमगाव गांगर्डे ते मिरजगाव या पाणीपुरवठा योजनेवर राजरोसपणे पाणीचोरी करत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकाराबाबत कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, कर्जत तहसीलदार, गटविकास अधिकारी व मिरजगाव ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. सात दिवसांत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा मिरजगाव येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर शिवसेना नेते अमृत लिंगडे, ग्रामपंचायत सदस्य सागर पवळ, संदीप बुद्धिवंत, चंद्रकांत कोरडे, सलिम आतार यांच्या सह्या आहेत.
मी येण्यापूर्वीचा हा विषय आहे. सदर नळ कनेक्शनची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नाही. येथे अर्धा इंची नळ कनेक्शन आहे. याबाबत वरिष्ठांचा अभिप्राय मागवला आहे. चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल
– सदाशिव आटोळे,
ग्रामविकास अधिकारी, मिरजगाव
हेही वाचा