Ashadhi wari 2023 : वामनभाऊंच्या दिंडीचे पहिले रिंगण उत्साहात | पुढारी

Ashadhi wari 2023 : वामनभाऊंच्या दिंडीचे पहिले रिंगण उत्साहात

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचे जामखेडमध्ये 10 हजार वारकर्‍यांसमवेत भक्तीमय वातावरणात आगमन झाले. यावेळी पहिले रिंगण जमादारवाडी जामखेड येथील संत वामनभाऊ महाराज गडावर मंगळवारी (दि.21) दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात पार पडले. गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. हा पालखी सोहळाही वर्षी विठ्ठल महाराज शास्त्रींच्या अधिपत्याखाली मोठ्या थाटात अन् मोठ्या लवाजम्यासह प्रस्थान ठेवले.

गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकाणवस्ती, वनवेवाडी, मातकुळी असा प्रवास करत जांबवाडी येथे सकाळी दिंडी दाखल झाली. जामखेड शहरामध्ये भक्तांनी दिंडीचे स्वागत केले. आमदार रोहित पवारांच्या एकात्मिक संस्थेकडून दिंडी सोहळ्यातील वारकर्‍यांना उपचार, औषधे वाटप करण्यात आले. शहरातील चेतन राळेभात, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जामखेड केमिस्ट संघटनेनांतर्फे फळे, चहा बिस्कीट, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील विठ्ठल मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले होते.

यानंतर जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिरात दुपारी दिंडीचे आगमन झाले. नंतर मानाचा अभंग व गोल रिंगण सोहळा पार पडला. मंदिराच्या प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर ‘पुंडलिक वरदे, हरी विट्ठल’, हा जय जयकार करत भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करण्यात आली. या पाठोपाठ दिंडीतील दोन अश्व धावले. वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले.

अभंगाच्या चालीवर अनेक महिला व पुरुषांनी फुगडीचा आनंद लुटला. यावेळी दादासाहेब महाराज सातपुते, बाळकृष्ण महाराज राऊत, ऋषिकेश महाराज माने व संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी होते. जमादारवाडी ग्रामस्थ व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यभरातून 10 हजाराहून आधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली.

हेही वाचा

भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भाऊ-बहिणीची गोष्ट कस्तुरी

पुणे : गुंडाला घेण्यास आलेल्यांवर हल्ला ; दोन टोळ्यांमधील प्रकार

खेड ग्रामपंचायत : चार वॉर्डातील 11 जागांचे आरक्षण जाहीर

Back to top button