पुणे : गुंडाला घेण्यास आलेल्यांवर हल्ला ; दोन टोळ्यांमधील प्रकार | पुढारी

पुणे : गुंडाला घेण्यास आलेल्यांवर हल्ला ; दोन टोळ्यांमधील प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  येरवडा कारागृहातून सुटलेल्या गुंडाला भेटून घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या तिघा मित्रांना गुंडाच्या विरोधी टोळीतील गुंडांनी हत्याराने वार करून जखमी केले. या प्रकरणी वैभव हुलीगाप्पा बुडगल (वय 22, रा. वल्लभनगर, पिंपरी) याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कल्ल्या ऊर्फ सुरज जाधव (रा. वल्लभनगर, पिंपरी) याच्यासह त्याच्या इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सुशांत जाधव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. हा प्रकार येरवड्यातील गोल्फ क्लब चौकात 7 जून रोजी रात्री आठ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचा मित्र सुशांत जाधव (रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याचे आणि सुरज जाधव हे दोघे एकाच भागात राहात असून, दोघांमध्ये वैर आहे. सुशांत जाधव याला एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यावर तो येरवडा कारागृहात होता. त्याला जामीन मिळाल्याने त्याची येरवडा कारागृहातून सुटका झाली होती. त्याला घेण्यासाठी फिर्यादी, त्यांचे मित्र अजय टाकळकर, अयुश कांबळे हे येरवडा येथे आले होते. सुरज जाधव याला भेटले. त्यांच्या नातेवाइकांच्या गाडीत बसून सुशांत जाधव हा निघून गेला. त्यानंतर ते रात्री पुन्हा पिंपरीला जाण्यास निघाले.

मोटारसायकलवरून गोल्फ क्लब चौकातून जात असताना मोटारसायकलवरून सुरज जाधव व त्याचे दोन साथीदार आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना थांबवून सुशांतला सोडवायला येता काय, असे म्हणून शिवीगाळ करून लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या उजव्या पायावर मारून फ्रॅक्चर करून गंभीर जखमी केले. त्यांच्या दोन्ही मित्रांना हाताने मारहाण केली. या प्रकाराने फिर्यादी घाबरून गेले होते. उपचार घेतल्यानंतर आता फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.

हे ही वाचा : 

कर्जत तालुक्यात स्टोन क्रेशरमुळे विकासकामांना गती !

मणिपूरमध्‍ये हिंसाचाराचे सत्र सुरुच, केंद्रीय गृहमंत्री घे‍णार सर्वपक्षीय बैठक

Back to top button