नगर : महसूल कर्मचार्‍यांना बदल्यांची प्रतीक्षा | पुढारी

नगर : महसूल कर्मचार्‍यांना बदल्यांची प्रतीक्षा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया 30 मेपर्यंत पूर्ण झाली असतानाच राज्य शासनाने 30 जूनपर्यंत बदल्यास मुदतवाढ दिली. त्यामुळे महसूल विभागाच्या बदल्या रखडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहे. मेपर्यंत शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. त्यानुसार जिल्ह्यातील 77 मंडल अधिकारी व अव्वल कारकून तसेच 62 महसूल सहायक व चार वाहनचालक अशा 143 कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया मे महिन्यात सुरू होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 30 मे रोजीच बदल्यांची ऑर्डर तयार केली होती. परंतु शासनाने 30 जूनपर्यंत बदली प्रक्रियेस मुदतवाढ दिली.

मुदतवाढ मिळताच बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या मनात पाल चुकचुकली. बदल्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होतील, अशी अपेक्षा कर्मचार्‍यांना होती. चार-पाच दिवसांपूर्वी महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन बदल्या करण्याची मागणी केली. परंतु अद्याप या मागणीला यश आले नाही.

Back to top button