नगर : जिल्ह्यात 56 हजार क्विंटल बियाणे पडून ! | पुढारी

नगर : जिल्ह्यात 56 हजार क्विंटल बियाणे पडून !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. कपाशी लागवडीही थांबल्याने जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 400 हेक्टरवरच पेरणी झाली आहे. त्यामुळे भात, बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, कपाशीचे तब्बल 56691 क्विंटल बियाणे 3500 कृषी केंद्रात पडून असल्याचे दिसते. त्यामुळे शेतकर्‍यांसह आता कृषी सेवा केंद्र चालकांनाही पावसाची प्रतीक्षा लागली आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाने यंदाच्या खरिपासाठी बियाणे आणि खतांचे नियोजन केले आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी खरिपाचे क्षेत्र विचारात घेता आवश्यक बियाणांची मागणीही वाढविण्यात आली आहे.

साडेसहा लाख हेक्टरवर खरीप जिल्ह्यात खरिपाचे 6 लाख 39 हजार 430 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित धरून त्यानुसार जिल्ह्याला 70570 क्विंटल बियाणे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 56691 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून,भाताचे 3212, बाजरीचे 2724, मका 6303, तूर 1380, मुग 1061, उडीद 4551, सोयाबीन 35479, कपाशी 1978 क्विंटलचा समावेश आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता
जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी शेतकर्‍यांना चांगल्या प्रतीचे आणि निर्धारीत मुल्यातच बियाणे विक्री करण्यासाठी कृषी केंद्र चालकांना सूचना केलेल्या आहेत. भरारी पथकाच्या माध्यमातून निरीक्षक गांगुर्डे यांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणी केलेली आहे. त्यातून जिल्ह्यातील 10 पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्र चालकांचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पुढे गेल्याचे समजते आहे.

पावसाने दडी मारल्याने चिंतेचे ढग
पावसाने दडी मारल्याने ज्या शेतकर्‍यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केली होती, ते शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याशिवाय पाऊस उशीरा झाला तर कृषी केंद्रात पडलेल्या बियाणांचे काय करायचे, ही चिंताही कृषी सेवा केंद्र चालक तसेच बियाणे कंपन्यांना आहेच. याशिवाय बाजारपेठेत आर्थिक उलाढालीसाठी पाऊस गरजेचा आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा वरूणराजाकडे लागल्या आहेत.

शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, समाधानकारक पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. तसेच बाजारात सर्व प्रकारची बियाणे उपलब्ध झालेली आहेत. एकाच वाणाचा आग्रह न धरता मान्यताप्राप्त कंपनीचे अन्य समतुल्य बियाणे खरेदी करावी. या संदर्भात काही मार्गदर्शन अथवा तक्रारी असल्यास थेट आमच्याशी संपर्क करा.
                                         – नीलेश कानवडे, कृषी विकास अधिकारी, जि.प.

 

 

Back to top button