अकोले: अल्पवयीन मुलाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या

अकोले: अल्पवयीन मुलाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या
Published on
Updated on

अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा : अकोले शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन एका मुलाची कॉलेजच्या गर्दनी परिसरात डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. अशरफ अतिक शेख (वय १७, रा. शाहूनगर) असे खुन करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांनी अकोले पोलीस ठाण्यावर मूकमोर्चा काढून या घटनेचा निषेध केला.

अशरफ शेख हा रविवारी दुपारच्या सुमारास बेपत्ता झाल्याने त्याचे वडील अतिक नौशाद शेख (वय ४२) यांनी रविवारी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अकोले पोलिस स्टेशनचे पो. उपनिरीक्षक भूषण हंडोरे, पो.हे.काँ. महेश आहेर, पो. काँ. सुयोग भारती, पो.काँ. आनंद मैड, पो. काँ. सहास गोरे, विठ्ठल शेरमाळे यांच्या पथकाने अशरफ शेखचा मोबाईल लोकेशन व सीसीटीव्हीवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच अशरफच्या कुटुंबियांनी देखील गर्दनी परिसरासह इतरत्र शोध घेतला. तरीही तो काही सापडून आला नाही. अशरफ वापरत असलेल्या मोबाईलवर देखील कुटुंबियांनी अनेकदा संपर्क साधला. मात्र, त्याचा मोबाईल बंद आला.

यानंतर अकोले पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. त्याचा मित्र साहिल मोहितेसह इतर दोन संशयित मित्रांनाही ताब्यात घेतले. परंतु, संशयित आरोपींकडून माहिती मिळत नव्हती. दरम्यान अशरफ शेख याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी मेंशन करण्यात आली होती. या स्टोरीवर अशरफ याचा एक फोटो टाकण्यात आला होता. या फोटोच्या पाठीमागे डोंगर दिसत असल्याने पोलिसांनी डोंगर परिसरात अशरफ याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान मुथाळणे घाटानजीक अशरफचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आला होता. त्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती अकोले शहरात वाऱ्यासारखी पसरली व शेकडो मुस्लिम बांधव मुथाळणे घाटात जमा झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान अशरफ याचा मृत्यू कोणत्या कारणाने झालाय हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्याचा मृत्यू हा डोक्यात लोखंडी रॉड घातल्याने झाला असल्याची माहिती अकोले पोलिसांकडून समजली आहे.

अशरफ शेख याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींना अटक केल्यानंतरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, असा निर्णय घेत मुस्लिम बांधवांनी घेतला. त्यानंतर अकोले बाजार पेठेतुन मुक मोर्चा पोलिस स्टेशनवर काढण्यात आला. त्याचे नंतर सभेत रुपांतर झाले. दरम्यान अकोले पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असुन वडगाव लांडगा येथील दोन संशियताचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र अशरफ याचा खून का करण्यात आला ? हे अद्याप समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत अकोले पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अकोले ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छादन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

अकोले शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाची गर्दनी परिसरात डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. हत्या करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असून त्याच्या मारेकरांच्या मुस्क्या लवकरच आवळल्या जातील. तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य व फोटो टाकणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाणार आहे.

सोमनाथ वाकचौरे, संगमनेर पोलीस उपविभागीय अधिकारी

 

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news