वाळकी : दशमीगव्हाण येथे पाठलाग करून पकडले चोर | पुढारी

वाळकी : दशमीगव्हाण येथे पाठलाग करून पकडले चोर

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील दशमीगव्हाण परिसरात सलग दोन दिवस धुमाकूळ घालणार्‍या चोरट्यांच्या टोळीपैकी दोघांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. या सहा जणांच्या टोळीचा ग्रामस्थांनी एक किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. शनिवारी (दि. 17) रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान हा थरार रंगला. यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेची मोठी मदत झाल्याचे सरपंच उद्धव कांबळे यांनी सांगितले. दश्मीगव्हाण गावात गेल्या दोन दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी साडेसातच्या सुमारास गावातील संपत गंगाधर काळे यांच्या घरी चोरी झाली होती. चोरट्यांनी 15 हजारांची रोकड व अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र नेले होते. शनिवारी (दि.17) रात्री साडेआठच्या सुमारास जामखेड रोडने काही चोरटे गावाच्या परिसरात आले त्यांनी गावाजवळ येऊन कपडे बदलले. ही बाब एका युवकाच्या निदर्शनास आली.

त्या वेळी चोरट्यांनी त्याच्यावर गलोलीने दगडांचा मारा केला. सदर युवकाने थोड्या अंतरावर जाऊन सरपंच उद्धव कांबळे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेला व संपूर्ण गावाला कळविले. हा संदेश प्रसारित होताच गावातील तरुण एकत्र आले आणि त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून सहापैकी दोघांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. चार जण दोन मोटारसायकलवरून पसार झाले.

या दोघांना पकडल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. नगर तालुका पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सुभाष थोरात आणि पोलिस नाईक भवार यांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. संकेत सुभाष चाठे (वय 27) व काळूराम चंदू माळी (वय 25, दोघे रा. देवी निमगाव, ता.आष्टी) अशी त्यांची नावे आहेत.

दशमीगव्हाण गावात ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्यामुळेच ग्रामस्थांना हे चोरटे पकडता आले. नगर तालुक्यातील सर्व गावांनी या ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपले गाव आपण सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

-उद्धव कांबळे,
सरपंच, दशमीगव्हाण

हेही वाचा

Nashik Crime : पती-पत्नीच्या वादाची कुरापत काढून एकास मारहाण

पुणे : गूळ, खाद्यतेलांची दरवाढ; साखर, गोटा खोबरे दरात घट

पुणे : हिरवी मिरची, गाजर, मटार महागला

Back to top button