कर्जत : खरिपाची मशागत झाली; आता आतुरता पावसाची… | पुढारी

कर्जत : खरिपाची मशागत झाली; आता आतुरता पावसाची...

गणेश जेवरे

कर्जत(अहमदनगर) : जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले, मान्सूनचे आगमन होणार होणार म्हणाले, मात्र अजूनही मान्सून आलाच नाही. रोज सुटणार्‍या नुसत्या वार्‍याने आणि प्रचंड उष्णतेमुळेे विहिरी-तलाव झपाट्यान कोरडे पडत आहेत. पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. अशा गंभीर परिस्थितीमुळे बळीराजा मात्र मनातून धास्तावला आहे.

कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची पेरणी करण्यात येते. मूग, उडीद, कापूस, सूर्यफूल, बाजरी, विविध प्रकारच्या तेलबिया यांचा यामध्ये समावेश आहे. कर्जत तालुक्यात कापसाच्या क्षेत्रामध्ये तर झपाट्याने मोठी वाढ झाल्याचे दिसून येत. वेळेवर पाऊस पडला तर कर्जत तालुका कापसासाठी चांगले व भरपूर उत्पादन घेणारा तालुका म्हणून ओळखला जाईल.

दुसरीकडे तालुक्यामध्ये कापसापेक्षाही तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेण्यात येते. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच तूर मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यात पेरण्यात येते. राज्यात सर्वात जास्त एकरी उत्पादन घेण्याचा चमत्कारदेखील कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी केला आहे. पिंपळवाडी निमगाव गांगर्डा या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तूर पीक घेत आहेत. यामुळे कर्जत तालुका आता तूर या पिकाचे आगर म्हणून ओळखला जातो.

तालुक्यातील शेतकरी हा पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांकडे वळण्याचे आशादायक चित्र तालुक्यात दिसून येते.असे असले तरी देखील पावसाने ओढ दिल्यास मात्र तालुक्यातील खरीप हंगाम प्रत्येक वर्षी संकटात सापडण्याची दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी मृग नक्षत्र सुरू होण्याअगोदरच वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात तालुक्यात पडत असतो.

यावेळी मात्र या पावसानेही हुलकावणी दिल्याचे दिसून येते. वळवाचा पाऊस झाला की, मृग नक्षत्रात एक दोन पाऊस झाले की पेरणी होते. शेतीच्या मशागतीची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. प्रचंड उष्णता वातावरणामध्ये निर्माण झाली आहे. दिवसभर सोसाट्याचा वारा सुटत आहे. सर्व प्रमुख पाझर तलाव विहिरी, नद्या, नाले, कोरडे पडले आहेत. बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे. ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे.

हेही वाचा

कोपरगावचे दीड कोटीचे वाचनालय धुळीत

बळीराजाचे डोळे आभाळाकडे..! पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या

राहुरी : रणरागिणीने बिबट्याचा हल्ला परतवून लावला..!

Back to top button