पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील महर्षी पराशर ऋषी वारकरी सेवा मंडळ व मातोश्री प्रतिष्ठाण आयोजित आषाढी वारी दिंडी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, भाऊसाहेब लामखडे व जनाबाई लामखडे या ज्येष्ठ वारकरी दांपत्यांच्या हस्ते प्रस्थान सोहळा पार पडला. तत्पूर्वी पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सपत्नीक माऊलींच्या पादुकांचे पूजन केले.
पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, माजी सरपंच अण्णा औटी यांच्या हस्ते विणा व मृदंग पूजन झाले. पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या हस्ते आरती झाल्यावर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांची सजवलेल्या रथातून पारनेरच्या मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. आणे (जुन्नर, पुणे) येथील रंगदास स्वामी वारकरी प्रशिक्षण संस्थेच्या बाल वारकर्यांनी प्रस्थान सोहळा मिरवणुकीत रंगत आणली.
टाळ, मृदंग तसेच ज्ञानोबा, तुकोबा, विठोबाच्या गजरानेरची बाजारपेठ दुमदुमून गेला होता. हनुमान मंदिराजवळ विकास अधिकारी दयानंद पवार यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तेथेच प्रस्थान सोहळा मिरवणुकीची सांगता झाली. दिंडी सोहळ्याचे आयोजक दिनेश औटी, शिक्षक नेते रा.या.औटी, पाटबंधारे कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल औटी, निवृत्त दुग्ध विकास अधिकारी नंदकुमार दरेकर, माजी उपसरपंच विजय डोळ, भीमराव पठारे, प्रकाश घोडके, श्यामराव भालेकर, संजय देशमुख आदी उपस्थित होते.
प्रस्थान सोहळा मिरवणुकीला भैरवनाथ मंदिरापासून सुरुवात झाली. यावेळी नगराध्यक्ष विजय औटी, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्यासह वारीतील वारकर्यांनी वारकरी फुगडीचा आनंद लुटला. पोलिस निरीक्षक गायकवाड आणि लहू महाराज शिंदे यांची फुगडी चांगलीच रंगली.
हेही वाचा