पुणतांबा : गणेश कारखान्यामध्ये परिवर्तन घडवा : आ. थोरात | पुढारी

पुणतांबा : गणेश कारखान्यामध्ये परिवर्तन घडवा : आ. थोरात

पुणतांबा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सहकारातून शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांना न्याय देण्याची भूमिका सहकारातून घेतली पाहिजे, मात्र गणेश कारखाना त्यांच्या 8 वर्षे ताब्यात होता. त्यांनी दुर्लक्ष करून सभासद व शेतकर्‍याला न्याय दिला नाही. ‘गणेश’च्या निवडणुकीत परिवर्तन मंडळाचे विजय निश्चित आहे. या निवडणुकीत बदल करून कारखान्याला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल, यासाठी सभासदांनी परिवर्तन करावे, असे आवाहन माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे विधी मंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.

पुणतांबा येथे गणेश कारखान्याच्या परिवर्तन मंडळाच्या निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत आ. थोरात बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी गंगाधर धनवटे होते. आ. थोरात म्हणाले, ‘गणेश’च्या निवडणुकीच्यानिमित्ताने 8 वर्षांचा कारभार कसा चालला, याचा हिशोब सभासदांमधून मिळत आहे. सभासद व ऊस उत्पादक कामगार यांच्यावर अन्याय करून त्यांनी हुकूमशाहीचे राजकारण चालविले, असा आरोप करुन, पुणतांबा येथे प्रचार सभा होत आहे. पुणतांबा गाव चळवळीचे केंद्र आहे. त्यामुळे गावातून नवीन इतिहास तयार होऊन सभासद दडपशाही विरोधात निश्चित बदल करतील, असा आत्मविश्वास आ. थोरात यांनी व्यक्त केला.

‘गणेश’ कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ऊस उत्पादकाला खर्‍या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे होता. तो न्याय मिळाला नाही. गणेश परिसर सुजलाम्- सुजलाम् होता, त्याची दुर्दशा कोणामुळे झाली. याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. गणेश कारखाना चालवण्यासाठी घेतला, मात्र त्यांचा हेतू चांगला नव्हता. प्रवरा परिसरात देखील हीच परिस्थिती आहे. दहशत निर्माण करून दबाव आणून सर्वसामान्यांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र आता ते कदापी सहन करणार नाही.

आम्ही ‘गणेश’च्या निवडणुकीत सहभाग घेतला तर लुडबुड कशाला करता, असे म्हणतात, मात्र संगमनेरमध्ये येऊन तुम्ही लुडबुड करून चांगल्या कामाला विरोध करता. आम्ही तिकडे जातो तिकडे विकासाचे काम घेऊन जातो, याचा आत्मपरीक्षण आपण करावे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे नाव न घेता आ. थोरात यांनी केली.

‘गणेश’च्या समृद्धीसाठी या निवडणुकीत परिवर्तन करून परिवर्तन मंडळाला संधी द्या. त्या संधीचे सोने आम्ही करू. संगमनेर व संजीवनी साखर कारखान्यांप्रमाणे ‘गणेश’ला खर्‍या अर्थाने न्याय देऊ, असा ठाम विश्वास आ. थोरात यांनी व्यक्त केला. यावेळी संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले, ‘गणेश’ कारखानाच्या निवडणुकीत सभासदांच्या रेट्यामुळे आपण सहभाग घेतला. सभासदांच्या भावना जाणून घेतल्या. खर्‍या अर्थाने त्यांच्यावर अन्याय झाला.

तो अन्याय दूर करण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहे, असे सांगत या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे दडपशाहीचे राजकारण सुरू केले, मात्र मी घाबरणार नाही. राजकीय किंमत मोजण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण कडू, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, सचीन चौगुले, लोणीच्या सरपंच प्रभावती घोगरे, सर्जेराव जाधव, चंद्रकांत डोके, शिवसेनेचे शहर प्रमुख महेश कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन गणेश बनकर यांनी केले.

हेही वाचा

राहुरी : अखेर स्थगित कामांना झाली सुरुवात : आ. तनपुरे

पुणे जिल्ह्यातील 18 धरणांनी गाठला तळ

सांगलीपूर्वी कोल्हापूर येथे टाकणार होते दरोडा

Back to top button