पुणे जिल्ह्यातील 18 धरणांनी गाठला तळ | पुढारी

पुणे जिल्ह्यातील 18 धरणांनी गाठला तळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील भागाला शेती तसेच पिण्यासाठी पाणीपुरवठा करणार्‍या जिल्ह्यातील 18 धरणांनी तळ गाठला आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही, त्यामुळे चिंता वाढली आहे. पुणे जिल्ह्यात पाच प्रमुख नद्या आहेत. त्यावर 25 धरणे आहेत. त्यातून पुणेकरांची तहान भागवली जाते आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणी दिले जाते. पुण्यातून वाहणारी मुठा, पिंपरी-चिंचवडमधून जाणारी मुळा या प्रमुख नद्याांबरोबरच घोड, भीमा आणि निरा या नद्यांचे पाणी साठवण्यासाठी ठिकठिकाणी धरणे बांधलेली आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश सर्वच धरणे काठोकाठ भरली होती. मात्र, यंदा कडक उन्हामुळे पाण्याची वाढती मागणी, बाष्पीभवन, पाण्याची चोरी आणि गळती अशा विविध कारणांमुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने संपत चालला आहे. पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, वडीवळे, कासारसाई, मुळशी, टेमघर, खडकवासला, गुंजवणी, निरा देवघर, नाझरे आणि उजनी या धरणांनी तळ गाठला आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा, तर उणे 15.03 अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा खालावला आहे. 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत मिळून एकूण 4.82 टीएमसी (16.53 टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. टेमघर धरणाची दुरुस्ती सुरू असल्याने या धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत आहेे. तसेच पानशेत आणि खडकवासला या धरणांत अनुक्रमे 1.35 टीएमसी आणि 0.91 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पाणीसाठा (टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी)
डिंभे 1.02 (8.16), चासकमान 0.61 (8.00), भामा आसखेड 1.97 (25.70), पवना 1.72 (20.16), टेमघर 0.13 (3.43), वरसगाव 2.43 (18.95), पानशेत 1.35 (12.65), खडकवासला 0.91 (46.32), गुंजवणी 0.62 (16.80), निरा देवघर 0.21 (1.79), भाटघर 1.39(5.91), वीर 1.77 (18.86) उजनी -15.20 (28.37).

Back to top button