अहमदनगर : ओपन प्लॉटधारकांना नोटिसा काढा; पालिका आयुक्तांचा आदेश | पुढारी

अहमदनगर : ओपन प्लॉटधारकांना नोटिसा काढा; पालिका आयुक्तांचा आदेश

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा तोंडावर आल्याने संसर्गजन्य आजार पसरू नये यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून धूर फवारणी, औषध साठ्याबाबत आढावा घेण्यात आला. आजाराला निमंत्रण ठरणार्‍या ओपन प्लॉटधारकांनी प्लॉट साफ करून घ्यावा. त्यात पाणी साचू देऊ नये. यासंदर्भात प्रभाग समिती कार्यालयांमार्फत संबंधितांना नोटिसा काढण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी दिला.

महापालिका आरोग्य विभागाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डास नियंत्रण समितीची बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, शहर अभियंता मनोज पारखे, नगररचनाकार राम चारठाणकर, चार प्रभाग समिती कार्यालयांचे प्रमुख, स्वच्छता निरीक्षक, खासगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पावसाळ्यात शहरात साथ रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागात पुरेशा कर्मचार्‍यांची आवश्यकता असल्याने बाह्य संस्थेमार्फत सुमारे 50 कर्मचारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंगीसारखा आजार बळावू नये म्हणून शहरात सर्वत्र औषध धुरळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, शहरातील सर्व दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही संबंधित आरोग्य अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

सावेडी, बोल्हेगाव, केडगाव, सारसनगर अशा उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात ओपन प्लॉट आहेत. त्या प्लॉटमध्ये पावसाळ्यात पाणी साठते. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढते. नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ओपन प्लॉटधारकांना नोटिसा काढून त्यांना प्लॉट साफ ठेवण्याबाबत सूचना करा. नोटिसा काढूनही प्लॉट साफ न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असेही आदेश देण्यात आले.

त्या विक्रेत्यांवर कारवाई करणार

शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर फळे, भाजीपाला विक्रेते हातगाड्या लावतात. रात्रीच्या वेळी उरलेला भाजीपाला, खराब झालेली फळे रस्त्यावरच टाकतात. त्यांनी ती फळे घनकचर्‍यात टाकावीत. रस्त्यावर घाण टाकताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

हेही वाचा

खरिपाचे नियोजन हितावह

पावसाचा गुंगारा : अहमदनगर जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या; फक्त 228 हेक्टरवर पेरणी

पावसाचा गुंगारा : अहमदनगर जिल्ह्यात दुप्पट टँकरने पाणीपुरवठा

Back to top button