पावसाचा गुंगारा : अहमदनगर जिल्ह्यात दुप्पट टँकरने पाणीपुरवठा | पुढारी

पावसाचा गुंगारा : अहमदनगर जिल्ह्यात दुप्पट टँकरने पाणीपुरवठा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा लांबल्यामुळे नगर जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. संगमनेर, अकोले, पारनेर, नगर या तालुक्यांच्या पाठोपाठ पाथर्डी तालुक्यातदेखील पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. सध्या जिल्ह्यातील 38 गावे आणि 178 वाड्यांतील 73 हजार लोकसंख्येला 28 टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात केवळ 14 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र पाऊस लांबल्याने एका आटवड्यातच टँकरची संख्या आणि टंचाई जाणवणारी लोकसंख्याही दुप्पट झाल्याने पावसाविना सुरू असलेल्या पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

गेल्या चार वर्षांपासून जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होत आली. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यांत टंचाईग्रस्त गावांची संख्या मोजकीच राहिली. यंदा मेअखेरपर्यंत फक्त 14 टँकर सुरू होते. मात्र, पावसाळा लांबला आणि टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील 2 गावे आणि 9 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या तालुक्यात तीन टँकर धावत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात टँकर धावत आहेत. सध्या या तालुक्यातील 10 गावे आणि 32 वाड्यांतील 18 हजार 631 लोकसंख्येला 8 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अकोले तालुक्यात 3 टँकरद्वारे 3 गावे आणि 17 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. नगर तालुक्यातील 5 गावे आणि 13 वाड्यांतील 7 हजार 410 लोकसंख्येसाठी 3 टँकर धावत आहेत.

पारनेर तालुक्यात पाणीटंचाईची झळ अधिक बसली आहे. या तालुक्यातील 18 गावे आणि 107 वाड्यांतील 32 हजार 272 लोकसंख्येची तहान 11 टँकरद्वारे तहान भागवली जात आहे. पावसाळा आणखी लांबल्यास टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होऊन टँकरचीही संख्या वाढणार आहे.

श्री गणेश मोटार वाहतूक संस्थेला ठेका

गेल्या वर्षी मेअखेरपर्यंत 50 गावे आणि 170 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. टँकर निविदेला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे 30 शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा शेवगाव येथील श्री गणेश मोटार वाहतूक संस्थेला पाणीपुरवठा करण्याचा ठेका मिळाला आहे. सध्या या संस्थेचे 20 टँकर धावत आहेत.

 

Back to top button