पावसाचा गुंगारा : अहमदनगर जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या; फक्त 228 हेक्टरवर पेरणी | पुढारी

पावसाचा गुंगारा : अहमदनगर जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या; फक्त 228 हेक्टरवर पेरणी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाने दडी मारली आहे. अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे खरीप पेरण्या खोळबल्या आहेत. आजमितीस जिल्ह्यातील 228 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झालेली आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील 215 कोपरगाव तालुक्यातील 13 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. इतर 12 तालुक्यांत अद्याप पेरणीचा शुभारंभ देखील झालेला नाही.

जून महिन्यात 108.2 इतका सरासरी पाऊस अपेक्षित आहे. गेल्या वर्षी या महिन्यात 113 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसास प्रारंभ झाला होता. त्यामुळे खरीप पेरणीसदेखील सुरुवात चांगली झाली होती. यंदा मात्र जून महिन्यातदेखील उन्हाचा तडाखा सुरूच आहे. रोहिणी नक्षत्र कोरडेच गेले. 7 जूनला मृगाचा पाऊस होईल अशी अपेक्षा होती. परंतु मृगाच्या पावसाची सुरुवात देखील कोरडीच झाली. मृग नक्षत्र संपत आले आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत प्रत्यक्षात फक्त 12.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यंदाच्या वर्षी 5 लाख 79 हजार 768 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट आहे. परंतु अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळबल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील 215 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. कोपरगाव तालुक्यात देखील पेरणीचा शुभारंभ झालेला आहे. या तालुक्यात 13 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

हेही वाचा

हजारो कोटींच्या नोटा आरबीआयमध्ये पोहोचल्याच नाही : अजित पवार यांनी केली चौकशीसह खुलाशाची मागणी

पावसाचा गुंगारा : अहमदनगर जिल्ह्यात दुप्पट टँकरने पाणीपुरवठा

खरिपाचे नियोजन हितावह

Back to top button