अहमदनगरची जिल्हा बँक सहकारातील दीपस्तंभ! राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

अहमदनगरची जिल्हा बँक सहकारातील दीपस्तंभ! राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेने आज मोबाईल बँकिंग सेवा सुरू करण्याचे महत्वाचे पाऊल उचलले आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आपली बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. राज्यातील सहकारी बँकांच्या क्षेत्रामध्ये दीपस्तंभ म्हणून सदैव मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या बँकेने केले आहे, असे गौरवोद्गार महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

नगर जिल्हा बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. सुजय विखे, मोनिका राजळे, आण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, राहुल जगताप, सीताराम गायकर, अरुण तनपुरे, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, अनुराधा नागवडे, करण ससाणे, अरुण मुंडे, अण्णासाहेब शेलार, रावसाहेब तनपुरे, उपनिबंधक गणेश पुरी, बँकेचे रावसाहेब वर्पे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, सहकार चळवळीची वाटचाल मोठी आहे. 1923 मध्ये लोणीत विविध कार्यकारी विकास सोसायटीची स्थापना झाली. आज शंभर वर्षे सोसायटीला होणे व ती टिकून राहणे हे कौतुकास्पद आहे. बँकेच्या राजकारणातही यापूर्वी अनेक राजकीय पक्षाचे मंडळी आली. मात्र येथे कधीही राजकारण झाले नाही. बँकेने नेहमीच शेतकर्‍याच्या हिताचा विचार केला. बँकेच्या दृष्टीने सहकारी सोसायट्या, दूध सोसायट्या, कारखाने, पगारदार पतसंस्था, बचत गट पुढे आले आहेत.

सहकारी सोसायट्यांच्या बरोबरीचे महिला बचतगटाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. प्रत्येक गावात सोसायटीशी बचत गट स्पर्धा करू शकते. त्यासाठी बचत गटांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा करावा, अशीही सूचना त्यांनी केली. तसेच यावेळी वाळूचे धोरण, दूध भेसळ रोखण्यासाठीच्या उपाययोजना, एक रुपयात पीकविमा, 75 हजार नोकरभरती, कर्जमाफीनंत्तरची सोसायट्यांची आर्थिक परिस्थिती, शेतकर्‍यांना मिळालेल्या कर्जाचा विनियोग, अशा वेगवेगळ्या विषयांनाही हात घालून त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा बँकेच्या ओटीएसच्या प्रश्नाला सरकारकडून मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिली.

बँकेचे चेअरमन कर्डिले म्हणाले, जिल्हा बँकेच्या मोबाईल बँकिग सेवेचा शुभारंभ माझ्या कार्यकाळात होणे हे माझे भाग्य समजतो. आता बँकेचे व्यवहार मोबाईलवरून करता येणार आहेत. पूर्वी ही बँक कारखानदारांची समजली जात, मात्र आज ही बँक शेतकर्‍यांची ओळखली जात आहे. त्यामुळे यापुढेही शेतकर्‍यांना केंद्रबिंदू ठेवून बँकेचा कारभार होईल. वेगवेगळ्या प्रकारची कर्ज उपलब्धता बँकेतून दिली जाईल. कर्जमर्यादेत वाढ करण्यासाठीही संचालक मंडळ लवकरच निर्णय घेईल, असेही सूतोवाच त्यांनी केले. या वेळी भानुदास मुरकुटे यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी बचत गटातील महिलांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते साडेतीन कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले.

‘जिल्हा एक नंबरला नेऊन ठेवू’

माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा बँकेच्या या कार्यक्रमातून आज जो सत्कार केला, यातून मला ऊर्जा मिळेल, स्फूर्ती मिळेल आणि जिल्हा बँकेतून मिळणारी ऊर्जा फार मोठी असते. येथे कर्डिले, मुरकुटे यांच्यासारखे लोक आहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांची ऊर्जा मला लाभली, तर नगर जिल्हा हा महाराष्ट्रात आपण एक नंबरला नेऊन ठेवू, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

पुणे रेल्वे स्थानकावरील जुना पादचारी पूल सुरू ; ज्येष्ठ, दिव्यांग नागरिकांना मिळणार दिलासा

सोनई : बालाजी मंदिरातून चोरीचा तपास लवकर लावावा

Back to top button