पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांकरिता धोकादायक म्हणून बंद ठेवण्यात आलेला पुणे रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन जुना पादचारी पूल पुन्हा सुरू झाला आहे. रेल्वे प्रशासनाने याचे नुकतेच स्ट्रक्चरल ऑडिट करून आणि आवश्यक तेथे डागडुजीनंतर हा पूल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पूर्वी कोरोना काळात हा एफओबी (फूट ओव्हर ब्रिज – पादचारी पूल) प्रवाशांच्या वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने बंद केला होता. हा पूल बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना इतर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक रेल्वे संघटना आणि रेल्वे बोर्ड सदस्यांची हा पूल सुरू करण्याची मागणी होती. हे लक्षात घेत मध्यंतरी पुणे स्टेशनवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी स्वत: येऊन या पुलाची पाहणी केली आणि पुण्यातील संबंधित अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी करून हा पूल सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या पुलाचे नुकतेच स्ट्रक्चरल ऑडिट केले. या ऑडिटदरम्यान प्रशासनाला काही त्रुटी आढळल्या, त्यांची दुरुस्ती केल्यावर हा पूल पुन्हा प्रवाशांकरिता वापरात आणला आहे.
या उपाययोजना केल्या…
गंजलेल्या खांबाच्या भागावर कव्हर वेब प्लेट बसविल्या
कॉलमला सपोर्टिंग क्लिट अँगल बसविले
रॅम्पच्या कॉलमला अतिरिक्त अँगल बसविले
पुलावर नव्याने काँक्रिटीकरण केले
प्रवाशांच्या सोईसाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या प्रयत्नाने आम्ही हा जुना बंद असलेला पूल प्रवाशांसाठी खुला केला. या पुलाला पायर्या आणि रॅम्प अशी व्यवस्था आहे. त्यामुळे याचा फायदा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. हा पूल सुरू करण्यापूर्वी आम्ही त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि आवश्यक तेथे डागडुजी केली आहे.
– डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभागकोरोना काळात रेल्वे प्रशासनाने हा ब्रिज बंद केला होता. रॅम्प आणि जुने ब्रिज हे रेल्वेच्या पुण्यातील काही अधिकार्यांनी पाडायचा घाट घातला होता. रेल्वे महाव्यवस्थापकांनी अनेकदा या पुलाची देखभाल-दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अद्याप हा पूल सुरू केला नव्हता. अखेर याची देखभाल दुरुस्ती करून सुरू केला आहे. यामुळे प्रवाशांना आता दिलासा मिळेल.
– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप
दै. 'पुढारी'च्या वृत्ताची दखल
पुणे रेल्वे स्थानकावर इतर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीचे रस्ते प्रवाशांना अपुरे पडत होते. तसेच ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना इतर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यांची सरकत्या जिन्यावरून जाताना पडझड होत असे, तर साध्या जिन्यावरून जाताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. याबाबत दै. 'पुढारी'मध्ये अनेकदा वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने नुकताच हा जुना पूल पुन्हा सुरू केला आहे.
कुलीला द्यावे लागणार नाहीत जादा पैसे
पुणे रेल्वे स्थानकावरील हा पादचारी पूल बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागे. कुलीला अतिरिक्त पैसे मोजून इतर प्लॅटफॉर्मवर जावे लागत असे. ते आता बंद होणार आहे. तसेच हा पूल बंद असल्यामुळे येथे असलेल्या बॅटरीवरील गाड्या धूळ खात पडलेल्या होत्या. त्यांचा वापर प्रवाशांना इतर प्लॅटफॉर्मवर पोहचविण्यासाठी होणार आहे. त्यासोबतच व्हीलचेअरच्या माध्यमातून ज्येष्ठ प्रवाशांची वाहतूक सुरळीतपणे करता येणार आहे.
हे ही वाचा :