सोनई : बालाजी मंदिरातून चोरीचा तपास लवकर लावावा | पुढारी

सोनई : बालाजी मंदिरातून चोरीचा तपास लवकर लावावा

सोनई(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील दरंदले गल्लीतील बालाजी मंदिरात मागील आठवड्यात झालेल्या चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा, यासाठी सोनई पोलिस ठाण्यावर गुरुवारी (दि.15) सायंकाळी मोर्चा काढण्यात आला. शुक्रवारी (दि.9) बालाजी मंदिरातील पाक शाळेच्या बाजूचा दरवाजा व मंदिरातील गाभार्‍याचा दरवाजा तोडून 500 वर्षांपूर्वीच्या पंचधातूच्या कलाकृती, पूरातन मूर्त्या व वस्तूचा ऐवज चोरीला गेल्याने सोनई परिसरात भाविकांमध्ये नाराजी पसरली. या चोरीचा लवकर तपास लावावा, यासाठी बालाजी भक्त, ग्रामस्थ, विश्वहिंदू परिषद व बजरंग दलातर्फे बालाजी मंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक ते पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा निघाला.

यावेळी ‘अटक करा अटक करा, चोरांना अटक करा, वेंकटरमना गोविंदा, परत आना, परत आना देव देवळात परत आना’ या प्रकारची मागणी भाविकांनी केली. सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी निवेदन स्वीकारले. या चोरीचा तपास लवकरात लवकर लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच धनंजय वाघ, सुनील तागड, अंबादास राऊत, बाळासाहेब सिकची, सुधीर दरंदले, चंद्रकांत कोहळे, महावीर चोपडा, संजय जोशी, देवस्थानचे विश्वस्त मुकंद गोसावी, जगदिश गोसावी, व्यवस्थापक राहुल लोहकरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Ashadhi Wari 2023 : संत चांगावटेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

नाशिक : शाळेच्या पहिल्याच दिवशी भोसला स्कूलच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी-पालकांचा ठिय्या

नेवासा तालुक्यातील देवगड ते पंढरपूर बस सेवा सुरू करा

Back to top button