नगर : ‘बुर्हाणनगर’ जलवाहिनी पुन्हा फोडली

वाळकी(नगर ) : पुढारी वृत्तसेवा : ठेकेदार संस्थेच्या कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे नगर-सोलापूर महामार्गावर दरेवाडी फाटा येथे बुर्हाणनगर योजनेची जलवाहिनी सोमवारी (दि.12) दुपारी पुन्हा फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. याची माहिती मिळताच शिवसेना आक्रमक झाली. शिवसैनिक तेथे पोहचण्यापूर्वीच रस्त्याच्या कामावरील सुपरवायझर आणि अभियंत्यांनी तेथून पळ काढला.
वारंवार फुटणार्या बुर्हाणनगर पाणी योजनेच्या जलवाहिनी स्थलांतर कामास शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे वेग आलेला आहे. त्यामुळे या योजनेच्या वारंवार विस्कळीत होणार्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच, हा प्रकार घडला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्यासह आकाश बडेकर, एकनाथ ससे, भाऊ बेरड, बाबा करांडे, नितीन बेरड, बाबा वीर, अशोक सांगळे आदींनी तेथे जाऊन कर्मचार्यांना जाब विचारला.
कार्ले यांनी यावेळी ठेकेदार कंपनीचे अधिकारी अमोल बोबडे यांच्याशी संपर्क साधून फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून देण्याची मागणी केली. कारण, लवकरच या मार्गावरून पंढरपूरला आषाढी वारीसाठी दिंड्या सुरू होणार आहेत. वारकरी दारात आले तर, त्यांना जेवण, नाश्ता, चहापाणी देता येईल, पण पाणी द्यायचे कुठून, असा प्रश्न सोलापूर रस्त्यावरील गावांतील लोकांपुढे उभा राहणार आहे. त्यामुळे तातडीने जलवाहिनी दुरुस्त करावी. तसेच, जलवाहिनी स्थलांतराचे काम होईपर्यंत महामार्गावरील खोदाई काम बंद ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिवसेनेने परिसरातील विविध गावच्या सरपंच व पदाधिकार्यांच्या समवेत आंदोलन केल्यानंतर, ठेकेदार संस्थेने बुर्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी स्थलांतराचे काम केल्याशिवाय महामार्गाच्या कामासाठी खोदाई न करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार या स्थलांतराच्या कामाला वेगही आला होता. मात्र, सोमवारी पुन्हा जलवाहिनी फुटल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. पुन्हा असे घडल्यास ठेकेदार संस्थेला काम करू देणार नाही, असा इशारा संदेश कार्ले यांनी दिला.
हे ही वाचा :
Nashik : विरोधी पक्ष सक्षम नाही ; भाजपचे कैलास विजयवर्गीय यांची टीका