

अहमदाबाद, वृत्तसंस्था : गुजरात 'एटीएस'ने 10 जून रोजी एका महिलेसह पाचजणांना अटक केली होती. पाचही जण इसिस खुरासान या संघटनेचे दहशतवादी असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासारखा गुजरातेत हल्ला घडविण्याची तयारी या पाचही दहशतवाद्यांनी चालविलेली होती. महिला दहशतवाद्यावर सुरत न्यायालय उडवून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
चारही दहशतवादी मूळचे श्रीनगरातील (काश्मीर) रहिवासी आहेत. ते मदरशातील शिक्षणासह दहावी, बारावीपर्यंत शिकलेले आहेत. चारही जणांना गुजरात एटीएसने पोरबंदरहून, तर त्यांच्या सहकारी महिलेला सुरतहून अटक केली होती. क्लाऊडचा वापर कसा करतात, सिमशिवाय मोबाईल फोनचा वापर कसा होतो, याचे प्रशिक्षण या पाचही जणांना देण्यात आलेले होते.
सुरत न्यायालयाची रेकी
सुरत न्यायालयावर आत्मघातकी हल्ला करण्याचा आदेश मला देण्यात आला होता. मी सुरत न्यायालयाची रेकीही केली होती. इसिस खुरासानच्या कमांडरचा आदेश मिळताच मी सुरत न्यायालय उडवून देणार होते, असे महिला दहशतवादी सुमैरा बानू हिने चौकशीत सांगितले आहे.
सहावा काश्मिरातून ताब्यात
पोरबंदर-सुरतहून पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा सहावा साथीदार झुबेर अहमद मुन्शी याला गुजरात एटीएसने काश्मीरमध्ये अटक केली. त्याला ट्रान्झिट रिमांडवर गुजरातेत आणले जात आहे. पाचही जणांना मदत करणार्या स्थानिकांचा शोध एटीएसतर्फे सुरू आहे.
डिजिटल डिव्हाईसेसमधून माहिती
सुमैरा बानू हिच्याकडून चार मोबाईलसह अन्य डिजिटल डिव्हाईसेस जप्त करण्यात आले होते. त्यातून तपासाला उपयुक्त ठरेल अशी बरीच माहिती समोर आली.