नगर : अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक

नगर : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. पोलिसांनी शेतकर्‍यांच्या वेशात केडगाव चौफुला (ता. दौंड, जि. पुणे) येथे दोन दिवस राहून आरोपींना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवारी (दि.11) पत्रकार परिषदेत दिली. राजू समशुद्दीन शेख (वय 31) व अजीज समशुद्दीन शेख (वय 28, दोघे रा.थोटेवाडी, दूरगाव, ता.कर्जत) अशी आरोपींची नावे असून, दोघेही सख्खे भाऊ आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत.

त्यांनी दूरगाव येथील मोलमजुरी करणार्‍या अल्पवयीन मुलीवर 7 एप्रिल रोजी अत्याचार केला व कोणाला सांगितल्यास आई व भावाला मारून टाकण्याची धमकी दिली. आरोपी केडगाव चौफुला येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्या आधारे पथकाने शेतमजुरांच्या वेशांत परिसरात वास्तव्य करून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार बबन मखरे, सुनील चव्हाण, अतुल लोटके, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, भीमराज खडसे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे यांनी ही कारवाई पार पाडली. या कामगिरीबद्दल या पथकाला दहा हजारांचे बक्षीस देत असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

एसपींचा 'अ‍ॅक्शन प्लॅन'
गुन्हेगारी रोखण्यासाठी 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया वाढविण्यात आल्याचे, तसेच चार एमपीडीए व 83 तडीपारीच्या कारवाया केल्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news