आर्क्टिक महासागरातील बर्फ 2030 पर्यंत नष्ट होणार? | पुढारी

आर्क्टिक महासागरातील बर्फ 2030 पर्यंत नष्ट होणार?

वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक परिणाम ध्रुवीय प्रदेशांवर विशेषतः उत्तर ध्रुव म्हणजेच आर्क्टिक प्रदेशावर दिसून येत आहे. आता एका नवीन संशोधनात असे आढळले की आर्क्टिक महासागरातील बर्फ 2030 पर्यंत पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो, याचा अर्थ 2030 पर्यंत या महासागरात उन्हाळ्यात बर्फ दिसणार नाही. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 1979 ते 2019 पर्यंतचा डेटा, उपग्रह प्रतिमा आणि हवामान मॉडेल्सचे विश्लेषण करून असे सांगण्यात आले की आर्क्टिक प्रदेशातील बर्फ अंदाजापेक्षा वेगाने वितळत आहे.

2021 मध्ये, युनोच्या पर्यावरण पॅनेलने सांगितले की शतकाच्या मध्यापर्यंत आर्क्टिक बर्फमुक्त होईल. अशी परिस्थिती अवघ्या दहा वर्षांतच होईल. आर्क्टिकचे तापमान इतर जगाच्या तुलनेत चारपट वेगाने वाढत आहे. गेल्या 40 वर्षांत, उन्हाळ्यानंतर राहिलेला बहुस्तरीय बर्फ 70 लाख चौरस कि.मी.वरून 40 लाख चौरस कि.मी. इतका कमी झाला आहे. जो भारताच्या क्षेत्रफळाइतका आहे. या वेगाने वितळत असलेल्या बर्फामुळे महासागरातील जलस्तर वाढेल, सागरी प्रवाह, मान्सून प्रभावित होईल जागतिक समुद्राची पातळी सध्या दरवर्षी 4.5 मि.मी.ने वाढत आहे, जी आर्क्टिक बर्फ वितळल्याने आणखी वेगाने वाढेल.

आर्क्टिकवर पडणारे बहुतेक किरण बर्फाने परावर्तित होऊन आकाशात परत जातात. बर्फ नसल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढेल. सागरी प्रवाह, मान्सून, चक्रीवादळ आणि जलचर वनस्पती आणि जीवजंतू प्रभावित होतील. आर्क्टिक बर्फ समाप्तीमुळे उष्णतेच्या लाटा, जंगलातील आग, पूर यासह अत्यंत हवामानाच्या घटनांमध्ये वाढ होईल.

संबंधित बातम्या
Back to top button