

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या खर्डा ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. भाजपाच्या संजीवनी वैजिनाथ पाटील या सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. या विजयाने राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली खर्डा ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात गेली आहे. आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांनी ही ग्रामपंचायत ताब्यात घेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन सरपंच नमीता आसाराम गोपाळघरे यांनी ठरल्याप्रमाणे मुदत संपल्याने राजीनामा दिला होता. त्यानंतर सोमवारी (दि.5) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत संजीवनी पाटील यांनी 9 मते मिळवित विजय संपादन केला. तर, राष्ट्रवादीच्या रोहिणी प्रकाश गोलेकर यांना 8 मते पडून त्यांचा 1 मताने पराभव झाला आहे.
यावेळी कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक वैजिनाथ पाटील, जामखेड शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, सोपान गोपाळघरे, संजय गोपाळघरे, अरणगावचे सरपंच शिंदे, नितीन सुरवसे, राजू मोरे, महेश दिंडोरे, आप्पासाहेब ढगे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुरवसे म्हणाले, जामखेड बाजार समितीच्या सभापती निवडीनंतर आमदार राम शिंदे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या व्यूहरचनेला ग्रामपंचायतीत यश आले. खर्डा ग्रामपंचायत ताब्यात घेत आमदार शिंदे यांनी आमदार पवार यांना जोरदार धक्का दिला आहे.
यावेळी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी संतोष नवले, तर सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते व तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी काम पाहिले. या वेळी खर्डा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश जानकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
खर्डा ग्रामपंचायत असो की जामखेड बाजार समिती, या माध्यमातून भाजपाचा झालेला विजय ही तर सुरुवात आहे. मात्र, 2024 ला आमदार रोहित पवारांना कळेल की, जामखेडकरांचा कौल हा भाजपच्या बाजूने आहे, असे बाजार समिती सभापती शरद कार्ले म्हणाले.
आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व रवींद्र सुरवसे, संजय गोपाळघरे व अजय काशिद यांच्यासह सर्व पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा व परिसरातील विविध विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सरपंच संजीवनी पाटील म्हणाल्या.
हेही वाचा