धुळे : गुंगीकारक औषधाची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या | पुढारी

धुळे : गुंगीकारक औषधाची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

तरुण पिढीला नशेची सवय लागणाऱ्या गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची तस्करी करणाऱ्या संशयिताला चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून औषधाच्या 195 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. औषधांचा साठा सुरत येथून आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी सुरत येथे पथकाला रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी तसेच पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे उपस्थित होते. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार असणारे प्रमोद पाटील यांना शब्बीर नगर परिसरामध्ये एक व्यक्ती गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तसेच संदीप ठाकरे, पंकज चव्हाण, रवींद्र ठाकूर ,संदीप पाटील, चेतन झोळेकर आदी पथकाला घेऊन शब्बीर नगर परिसरातील 2000 वस्ती येथे छापा टाकला. यावेळी अकबर अली कैसर अली शेख हा व्यक्ती संशयितरित्या बॉक्स हाताळत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे मिळालेल्या बॉक्समधून खोकला बरा होण्यासाठी वापरले जाणारे औषध आढळून आले. मात्र ही औषधी गुंगी येण्यासाठी वापरली जात असल्याचे यापूर्वी झालेल्या कारवायांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी शेख याच्याकडे हा औषध साठा हाताळण्याचे कागदपत्रांची मागणी केली. मात्र त्याच्याकडे कोणतेही प्रकारची कागदपत्रे आढळून आली नसल्याने ही तस्करी असल्याची बाब उघड झाली. प्राथमिक तपासामध्ये शेख याने हे औषध सुरत येथील तस्कराकडून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तपास पथक मुख्य तस्कराला अटक करण्यासाठी सुरत येथे रवाना होणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. दरम्यान तरुण पिढीला नशेच्या आहारी नेणाऱ्या अशा औषधांची तस्करी करण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास त्याची माहिती पोलीस पथकाला देण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

Back to top button