श्रीरामपूर : निळवंडेच्या पाण्याने दुष्काळी भागाचे परिवर्तन होणार ; आ. थोरात | पुढारी

श्रीरामपूर : निळवंडेच्या पाण्याने दुष्काळी भागाचे परिवर्तन होणार ; आ. थोरात

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अनेक अडचणीवरती मात करत आपण निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविला. इतक्या वर्षाच्या अथक परिश्रमानंतर संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी आले. हा त्या दुष्काळी भागातील जनतेच्या जीवनातील आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. निळवंडेच्या पाण्यामुळे दुष्काळी भागातील जनतेच्या जीवनात नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणातील डाव्या कालव्याचे पाण्याने संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथील बोगद्यातून तालुक्यात प्रवेश केला. त्या पाण्याचे आ. थोरात यांच्या हस्ते साडी चोळी वाहून पूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, प्रतापराव ओहोळ, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, उत्तमराव घोरपडे आदींसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, निळवंडेच्या कामांमध्ये अनेकांचे योगदान आहे. अनेकांनी यासाठी त्याग केला आहे. सर्वांच्या कामातून आणि त्यागातून आजचा सुवर्ण दिवस सर्वांना पाहायला मिळाला आहे. डाव्या कालव्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. धरणात पाणी शिल्लक असताना यातून चाचणी व्हावी यासाठी आपण पाठपुरावा केला. उजव्या कालव्याचे कामही तातडीने व्हावे हाच आपला कायम आग्रह राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

माजी आ. डॉ तांबे म्हणाले, निळवंडे धरण व कालव्यांचे खरे श्रेय हे आमदार बाळासाहेब थोरात यांचेच आहे. त्यांनी जीवनाचे ध्येय मानून धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. दुष्काळी भागातील सर्वसामान्य व गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, यासाठी हे काम केले असून ही स्वप्नपूर्ती होत असल्याने हा तालुक्याच्या दृष्टीने भाग्याचा दिवस आहे. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा , जवळे कडलग व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नागरिक, महिला, युवक, यांचे सह निळवंडे पाटपाणी कृती समिती कार्यकर्ते उपस्थित होते

कालव्यांच्या दुतर्फा विद्युत रोषणाई

निळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्याने डाव्या कालव्यातून पिंपळगाव कोझीरा बोगद्यातून संगमनेर तालुक्यात प्रवेश केला. त्यावेळी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने कालव्यांच्या दुतर्फा मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. निळवंडेचे जनक आ. बाळासाहेब थोरात यांची ढोल ताशांच्या व पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कालव्याच्या किनारी कार्यकर्त्यांनी भजन व अभंग गात वातावरण भक्तिमय केले.

अनेक जण श्रेयासाठी झटत आहेत : आ. थोरात

निळवंडे धरण पूर्ण करण्याचे आपले स्वप्न होते ते आपण पूर्ण केलेले आहे. अनेक जण श्रेयासाठी झटत आहेत. मात्र, आपण कधी श्रेयासाठी काम केले नाही, असा टोला माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी निळवंडेचे श्रेय घेणार्‍यांना लगावला.

हेही वाचा

अध्यक्ष मिळेल का, अध्यक्ष? पुणे विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्षपद रिक्तच

मानवी शरीरच करणार मोबाईलचे चार्जिंग!

नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाज आक्रमक

Back to top button