मानवी शरीरच करणार मोबाईलचे चार्जिंग! | पुढारी

मानवी शरीरच करणार मोबाईलचे चार्जिंग!

नवी दिली : मोबाईल, लॅपटॉप वगैरे उपकरणांचे चार्जिंग ही एक समस्याच बनलेली असते. विशेषतः प्रवासात अशी कटकट अनेकांना वैताग आणत असते. अर्थात हल्ली ‘पॉवर बँक’सारखी साधने असली तरीही अनेकांना वेळेच्या वेळी चार्जिंग करणे डोकेदुखीचेच वाटते. आता आयआयटी मंडीमधील प्रा. अजय सोनी यांनी यावर एक उपाय शोधला आहे. त्यांनी मानवी शरीराच्या उष्णतेवरच असे गॅझेटस् चार्ज करण्याबाबतचे संशोधन केले आहे.

सोनी यांनी थर्मो इलेक्ट्रिकल मटेरियलवर संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की या पद्धतीमध्ये एक खास मॉड्यूलच्या मदतीने उष्णतेपासून ऊर्जा मिळवता येऊ शकते. अर्थात ही सौरऊर्जेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यासाठी मोठे उपकरण किंवा सूर्यासारख्या विशाल व अत्यंत उष्ण स्रोताची आवश्यकता नाही. अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांना केवळ मानवी शरीराच्या उष्णतेनेच चार्ज केले जाऊ शकते.

सोनी यांनी सांगितले की त्यांनी एक असे प्रोटोटाईप विकसित केले आहे जे मॉड्यूलच्या मदतीने मानवी शरीराच्या उष्णतेने ऊर्जा मिळवू शकते. या ऊर्जेचे रूपांतर विद्युतऊर्जेत करता येते. या तंत्राच्या सहाय्याने मोबाईल फोन केवळ हातात पकडून किंवा त्याला खिशात ठेवूनही चार्ज करता येईल. तसेच लॅपटॉपही मांडीवर ठेवूनच कोणत्याही चार्जर, सॉकेट आणि स्विचशिवाय चार्ज करता येऊ शकेल. या सर्व उपकरणांमध्ये एक छोटेसे मॉड्यूल सेट केले जाईल. त्यानंतर हे मॉड्यूल शरीराच्या उष्णतेच्या सहाय्याने ही उपकरणे चार्ज करील!

Back to top button