नामांतराचे स्वागत; पण विभाजन नको! : आमदार रोहित पवार | पुढारी

नामांतराचे स्वागत; पण विभाजन नको! : आमदार रोहित पवार

नगर, पुढारी वृत्तसेवा: अहमदनगरचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ अशा नामांतराच्या घोषणेचे आम्ही स्वागतच करतो; मात्र भविष्यात विभाजनापेक्षा विकासाचा समतोल ठेवला, तर राज्यात सर्वांत मोठा जिल्हा म्हणून असलेली आपली ओळख कायम राहील, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी मांडली.

नगर येथे सायंकाळी पत्रकार परिषदेत आमदार पवार म्हणाले, की चौंडी येथे धनगर आरक्षणावर बोलले जाईल, अशी अपेक्षा होती. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करणारे नेते या व्यासपीठावर होते. केंद्रातही त्यांचे सरकार आहे, तरीही आरक्षणाचा निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे धनगर समाज नाराज आहे.

नगरच्या नामांतराचे स्वागत करतो. पण विकासही झाला पाहिजे. केवळ भावनिक मुद्द्यांमुळे लोकांचे पोट भरणार नाही. फक्त मंडप, खुर्च्या, स्टेज, कमानी यावरच जर 50 लाखांचा खर्च झाला असेल, तर याच्या खोलात जावे लागेल, असेही सूतोवाच पवार यांनी केले. अहमदनगर हा राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे. केवळ विकासाचा असमतोल असल्याने कोणी विभाजनाची मागणी करत असेल, कोणी नेते मागणी करत असतील; मात्र जिल्ह्यातील प्रत्येक तालुका डोळ्यासमोर ठेवून विकासाचा समतोल ठेवल्यास सर्वांत मोठा जिल्हा ही ओळख कायम राहील, अशा शब्दात त्यांनी विभाजनाला असहमती दर्शविली.

पंकजा मुंडेंनी लढत राहिले पाहिजे

पंकजा मुंडे यांना आपण राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण किंवा काही सल्ला देऊ शकत नाही, असे स्पष्ट करताना पवार म्हणाले, की त्यांचे कालच्या भाषणातील शब्द पाहता त्यांनी हार न मानता लढत राहिले पाहिजे, एक कार्यकर्ता म्हणून आपण हीच अपेक्षा करू शकतो. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत ‘त्यांचे शिक्षण किती, ते देवाची शपथ किती पाळतात,’ अशी टिप्पणी करत ‘लबाड लांडगा’ कोण, हे जनता ओळखून आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा:

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग ‘हे’ सुद्धा लक्षात असूद्या

जीवघेण्या ऍसिडिटीवर घरगुती उपाय- Acidity Home Remedy

Shivrajyabhishek Din 2023: रायगडच्या धर्तीवर प्रतापगड विकास प्राधिकरण; पाचाड शिवसृष्टीसाठी ५० कोटी : मुख्यमंत्र्यांची घोषणा

Back to top button