किल्ले रायगड; इलियास ढोकले : मागील पाच वर्षांपूर्वी तत्कालीन युती शासनाने घोषित केल्याप्रमाणे किल्ले रायगड प्रमाणेच आता प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याची घोषणा आज (दि. २) किल्ले रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार उदयनराजे भोसले असतील. त्याचप्रमाणे किल्ले रायगड च्या पायथ्याशी पाचाड येथे शिवसृष्टी निर्मितीसाठी 50 कोटींची तरतूद करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी (Shivrajyabhishek Din 2023) यावेळी जाहीर केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चांदीच्या मूर्तीला 350 ठिकाणाहून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवभक्तांना संबोधित केले.
यावेळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, सोलापूर, पालघर, बेळगाव, खानदेश , उत्तर महाराष्ट्र येथून हजारो शिवभक्त, महिला उपस्थित होत्या. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
350 व्या राज्याभिषेक सोहळासाठी (Shivrajyabhishek Din 2023) किल्ले रायगडवर कान्होजी जेधे यांचे वंशज, जगतगुरु तुकाराम महाराज यांचे वंशज मोरे, महाराज गुरुवर्य धायरेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खा. उदयनराजे भोसले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, दादा भुसे , गिरीश महाजन , दीपक केसरकर, आ. बच्चू कडू, आ. प्रकाश सुर्वे, आ. भरतशेठ गोगावले, रवींद्र पाटील, आ. महेंद्र थोरवे , आ. प्रवीण दरेकर, आ प्रशांत ठाकूर, आ. अनिकेत तटकरे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खा. श्रीरंग बारणे, खा. सुनील तटकरे आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते. मनसे प्रमुख राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे यांचीही उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अनेक किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनामार्फत दुर्ग संवर्धन प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल. केंद्र शासनाच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार व वाघ नखे भारतात आणण्याचे प्रयत्न राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सुरू आहे. नजीकच्या काळामध्ये यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार राज्य सरकार काम करत आहे. दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक करू, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ग्रंथ तयार केले असून ते जनतेसाठी उपलब्ध केले जातील, असे सांगितले.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील जिल्हाधिकारी यांच्या दालनात आणि प्रत्येक मंत्र्यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा लावण्यात येईल.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले की, राज्य शासनाने अधिकृत शिवछत्रपती यांचा इतिहास प्रसिध्द करण्यात यावा. राज्यात, देशात महापुरुषांची बदनामी केली जाते. त्याविरोधात कडक कायदा करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा