महिलांच्या खुनांनी पाथर्डी हादरले! संशयावरून तरुणीचा गळा आवळला; दुसर्‍या घटनेत डोक्यात कुर्‍हाड घातली | पुढारी

महिलांच्या खुनांनी पाथर्डी हादरले! संशयावरून तरुणीचा गळा आवळला; दुसर्‍या घटनेत डोक्यात कुर्‍हाड घातली

पाथर्डी (नगर), पुढारी वृत्तसेवा: भाचीला प्रियकरासोबत पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून तरुणीला लोखंडी पाईप व रॉडने मारहाण करून ठार केले. तालुक्यातील साकेगाव येथे सोमवारी (दि. 29) रात्री साडेदहानंतर ही घटना घडली. तर, दुसर्‍या घटनेत येळी येथे महिलेच्या डोक्यात कुन्हाड घालून तिचा खून करण्यात आला. या दोघींच्या खूनाने पाथर्डी हदरले आहे. गीता रमेश राठोड (वय 18) असे मृत मुलीचे नाव असून, तिची आई सविता रमेश राठोड यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दुसर्‍या घटनेत सारिका बाप्पू हंगे (वय 30 रा. शंकरवाडी, सोनई, ता. नेवासा हल्ली रा. येळी. ता. पाथर्डी) असे खून झालेल्या महिलेचा नाव आहे.

साकेगाव येथील हनुमाननगर तांड्यावर गीता व कुटुंबीय राहतात. तिचे वडील रमेश राठोड कामानिमित्त परराज्यात असतात. याच तांड्यावर त्यांच्या शेजारी स्वप्नील धोंडीराम राठोड राहतो. दोन महिन्यांपासून स्वप्नीलची भाची त्यांच्याकडे राहावयास आली होती. तिला प्रियकरासोबत पळून जाण्यास गीता मदत करत असल्याची शंका स्वप्नीलला होता. 29 मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्वप्नील राठोड, मनीषा सुरेश चव्हाण (रा. हनुमाननगर तांडा, साकेगाव), उषा बबन पवार (रा. खांडके, जि. अ.नगर) हे सर्व जण गीताच्या घरी गेले व तिला मोटरसायकलवर बसवून घेऊन गेले. गीता लवकर घरी न आल्याने भाऊ रोहन तिला पाहण्यासाठी गेला. त्या वेळी डांगेवाडी येथे स्वप्नीलचे नातेवाईक हरीश प्रभाकर पवार यांच्या घरी गीतास मारहाण सुरू होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आईच्या फिर्यादीवरून स्वप्नील धोंडिराम राठोड़, मनीषा सुरेश चव्हाण, उषा बबन पवार (रा खांडके), हरेश प्रभाकर पवार (रा. डांगेवाडी, ता. पाथर्डी) किरण रामसिंग राठोड, अजय शंकर जाधव, नीलेश रमेश राठोड (सर्व रा. साकेगाव ता. पाथर्डी) बबन पवार, अभिषेक बबन पवार (रा. खांडके) या आरोपींनी गीताला मारहाण करून, गळा आवळून ठार केले व मृतदेह विहिरीत टाकून दिला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेतील दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली. कविता शरद घुगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नामदेव अंबादास बडे (रा. येळी), अतुल पोपट फुंदे (रा. कोळसांगवी, शिवार, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सोमवारी (दि. 29) रात्री दोन वाजता आरोपी बडे व फुंदे यांनी कविता घुगे यांच्या घरी येऊन कुर्‍हाडीने ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीची आई लताबाई रामकिसन बडे व बहिण सारिका बापू हंगे यांच्या डोक्यात कुर्‍हाड घालून गंभीर जखमी केले. त्यांना तातडीने नगर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान सारिका हंगे यांचा बुधवारी मृत्यू झाला. नामदेव बडेने कविता शरद घुगे यांनाही गंभीर दुखापत केली. याप्रकरणी पोलिसांनी नामदेव अंबादास बडे व अतुल पोपट फुंदे यांना अटक केली. वडील रामकिसन कारभारी बडे यांचे व त्याचा पुतण्या नामदेव अंबादास बड़े यांच्यात जमीन वाटपावरून यापूर्र्वी वाद झाले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. मयत सारिका हंगे यांना सहा महिन्यांचा मुलगा आहे.

विहिरीत आढळून आला गीताचा मृतदेह

रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून आई सविता राठोड व इतर नातेवाईक शोध घेत होते. त्यावेळी तांड्याच्या परिसरातील विहिरीत गीता राठोडचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा:

नगर: अतिवृष्टी निधीचा मार्ग मोकळा, आधार प्रमाणिकरण करण्याचे महसूलचे आवाहन

नगर: बेलवंडी पोलिसांकडून सात किलो गांजासह एक ताब्यात

नगर: अग्निशमन विभागाला मिळणार बळ, पंधरा दिवसांत 40 कर्मचारी, नवीन बंबही होणार दाखल

 

Back to top button