नगर: बेलवंडी पोलिसांकडून सात किलो गांजासह एक ताब्यात | पुढारी

नगर: बेलवंडी पोलिसांकडून सात किलो गांजासह एक ताब्यात

श्रीगोंदा (नगर), पुढारी वृत्तसेवा: श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा परिसरात बेलवंडी पोलिसांनी रस्त्यावरील वाहने तपासात असताना आलिशान चारचाकी गाडीतून 74 हजार रुपये किमतीचा 7 किलो 418 ग्रॅम गांजा आणि चारचाकी गाडी असा एकूण 6 लाख 24 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला अटक केली. बबन संभाजी पंदरकर रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ढवळगाव ते पिंपळगाव पिसा रोडवर अवैध दारू व बनावट हत्याराची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पो.नि. संजय ठेंगे यांनी आपल्या सहकार्‍यांसह मंगळवार दि.30 रोजी संध्याकाळी पिंपळगाव पिसा येथील आठाचा मळा परिसरात येणार्‍या जाणार्‍या सर्व संशयीत वाहनांना थांबवुन त्याची तपासणी करत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गाडी क्र एम.एच 1 ए एल 1234 ही आलिशान गाडी आली. गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये सिटच्या खाली खाकी रंगाचे पुडके दिसून आले.

या संदर्भात अधिक विचारणा केली असता त्यात गांजा असल्याचे आरोपीने सांगितले. सात किलो 418 ग्रॅम वजनाचा 74 हजार रुपये किमतीचा गांजा, पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीची चारचाकी पजेरो गाड़ी असा एकुण 6 लाख 24 हजार 90 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत बबन संभाजी पंदरकर रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा या आरोपीला ताब्यात घेत याचे विरुदध एन.डी.पी.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक गाजरे, सहाय्यक फौजदार आर. टी. शिंदे, पो.हे.कॉ. हसन शेख, अजिनाथ खेडकर, भाऊ शिंदे, पो. कॉ. विनोद पवार, संदिप दिवटे, कैलास शिपनकर सतीश शिंदे, भांडवलकर, महिला पोलिस नाईक सुरेखा वलवे, महिला पोलिस कॉन्स्टेबल घोगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कर्जत येथील पो.हे.कॉ प्रकाश शिंदे, पो. कॉ. इरुफान शेख यांनी केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गाजरे करत आहेत.

Back to top button