निळवंडे कालव्याच्या उद्घाटनाची संधी नशिबाने तुम्हाला मिळाली; बाळासाहेब थोरातांचा विखेंना टोला | पुढारी

निळवंडे कालव्याच्या उद्घाटनाची संधी नशिबाने तुम्हाला मिळाली; बाळासाहेब थोरातांचा विखेंना टोला

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा: निळवंडे धरण कोणी बांधले आहे, हे सर्व जनतेला माहीत आहे. परंतु, कालव्याचे उद्घाटन करण्याची संधी नशिबाने तुम्हाला चालून आली आहे. तर त्याचा उपयोग करून दुष्काळी भागातील जनतेला पाणी द्या, असा टोला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता लगावला.

संगमनेर येथील सहकार महर्षी थोरात महाविद्यालयाच्या सभागृहात संपादक सेवा संघाच्यावतीने संपादक राज्य परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
चालू वर्षीच्या मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये भंडारदरा धरणात १० टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, ते पाणी निळवंडे कालव्याद्वारे दुष्काळी भागाला सोडणे गरजेचे होते. परंतु पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करायचे आहे, असे सांगून वेळ काढूपणा करण्याचे काम सरकार करत आहे. दुष्काळी भागातील जनतेसाठी पाणी देण्यासाठी निळवंडेच्या कालव्यांना पाणी सोडण्साठी आम्हाला शासनाला पत्र द्यावे लागते, हे योग्य नाही, असे थोरात म्हणाले.

आता पुन्हा दोन हजाराची नोट बंद करण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा निर्णय अर्थव्यवस्थेच्या स्थितरांच्या दृष्टीने योग्य नाही. देशातील सर्वोच्च पदावर असणाऱ्या राष्ट्रपतींना जर देशाच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला निमंत्रित केले जात नाही, ही देशाच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे, असेही थोरात यावेळी म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button