अहमदनगर : डिझेल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश; तिघांना बेड्या | पुढारी

अहमदनगर : डिझेल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश; तिघांना बेड्या

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपावरून डिझेल चोरी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पदार्फाश केला असून, तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. टोळीतील सहाही आरोपी उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून 280 लिटर डिझेल व गुन्ह्यात वापरलेला ट्रक, असा सुमारे सव्वा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तान्हाजी अशोक काळे, ज्ञानेश्वर विनायक शिंदे (दोघे रा.जोगेश्वरी वस्ती, पारा, ता. वाशी, जि.उस्मानाबाद), पोपट व्यंकट पवार रा.येरमाळा, ता. कळंब, जि.उस्मानाबाद) या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

प्रवीण सिद्धराम दिड्डी यांचा नांदुर-शिंगोटे ते लोणी रस्त्यावर (ता.संगमनेर) पेट्रोल पंप आहे. तेथे 18 मे 2023 रोजी रात्री कर्मचारी झोपलेले असताना तीन लाख 52 हजार 330 रूपये किमतीचे तीन हजार 780 लिटर डिझेल चोरट्यांनी चोरून नेले होते. पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक मनोज पितांबर झांबरे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तान्हाजी काळे याने साथीदारांसह ही चोरी केल्याची माहिती एलसीबीला मिळाली. एलसीबीचे पथक काळे याच्या राहत्या घरी तपासासाठी पोहोचले. घरासमोर उभ्या असलेल्या ट्रकबाबत विचारणा केली असता ट्रक हा त्याच्या मेहुणा मुरलीधर पिंटू शिंदे याचा असल्याचे सांगितले. ट्रकची झडती घेतली असता पोलिसांना डिझेलने भरलेले प्लॉस्टिकचे ड्रम मिळून आले.

पोलिसी खाक्या दाखविताच त्याने डिझेल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, तान्हाजी काळे व ज्ञानेश्वर शिंदे या दोघांनी पाथर्डी व शेवगावातील पेट्रोल पंपावर देखील डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपास संगमनेर पोलिस करीत आहेत. जामखेड, खर्डा, उस्मानाबाद परिसरात ‘सर्च ऑपरेशन’ राबवून डिझेल चोरणार्‍या आरोपींचा एलसीबीच्या दोन पथकाने शोध घेतला. एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदारांनी ही कारवाई पार पाडली.

पोलिस पसार आरोपींच्या मागावर

डिझेल चोरीच्या घटनेतील सहा आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली. तर, अर्जुन व्यंकट पवार, दत्तू शिंदे (दोघे रा. जोगेश्वरीवस्ती, पारा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), आनंद पवार (रा. आळणी, ता. जि. उस्मानाबाद) हे तीन आरोपी पसार झाले असून, पोलिस तिन्ही आरोपींच्या मागावर आहेत.

Back to top button