
अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी शहरात घरफोडी करून दागिने चोरणार्या दोन आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी जात असताना एलसीबीच्या पथकाने तिसगाव रस्त्यावरून (ता.पाथर्डी) आरोपींना ताब्यात घेतले. अरुण अभिमान काळे (वय 24, रा.पारनेर, ता.पाटोदा, जि.बीड), पवन भरत काळे (वय 19, रा.हरीनारायण आष्टा, जि.बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पाथर्डी शहरातील जयभवानी चौकात राहणार्या किरण रमेश लाटणे (वय 43) यांच्या घरातून चोरट्यांनी 95 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख चोरून नेली होती. त्यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून, बीड जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी दोन जण शेवगावच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तिसगाव रस्त्यावर सापळा लावला होता.
दुचाकीवरून येणार्या दोघांना पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दागिने मिळून आले. पथकाने पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी पाथर्डी परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. तीन लाख 25 हजार रुपये किमतीचे दागिने व एक दुचाकी असा तीन लाख 75 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी रेकॉर्ड तपासले असता अरुण अभिमान काळे हा अट्टल गुन्हेगार असल्याचे दिसून आले. त्याच्यावर पुणे, बीड व अहमदनगर जिल्ह्यात चोरी, गंभीर दुखापत अशे तीन गुन्हे दाखल आहेत.