अहमदनगर : वरिष्ठांच्या आदेशाने एक पाऊल मागे : आमदार राम शिंदे

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पेल्यातील वादळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाष्य केले आहे. मी वस्तुस्थिती वरिष्ठांना सांगितली असून, त्यावर आणखी काही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, मी केलेला दावा खरा आहे. आता वरिष्ठांच्या आदेशानुसार मी एक पाऊल मागे घेतले आहे. त्यांनी सुद्धा एक पाऊल मागे घ्यावे, असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी विखे यांच्या भूमिकेबाबत स्पष्ट केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त आमदार शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत खुर्ची नाट्याबद्दल विचारता आमदार शिंदे म्हणाले, व्यासपीठावर लावलेल्या खुर्चीवर माझे नाव नव्हते. मी विधान परिषदेचा सदस्य आहे. खुर्चीवर नाव नसल्याने मी व्यासपीठाच्या खाली उतरलो. मी खाली उतरल्याचे पाहिल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मला व्यासपीठावर खुर्ची उपलब्ध करून दिली.
उपमुख्यमंत्र्याशी चर्चेनंतर तुम्ही समाधानी आहात का, असे विचारले असता ते म्हणाले, मी पार्टी बेस कार्यकर्ता आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतर मीडियासमोर आलो. माझे म्हणणे मी अचानक मीडियासमोर मांडलेले नाही. वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी थांबलो आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आल्यानंतर बरोबर थांबावे लागते. आता मी दोन पावले मागे आलो आहे. भविष्यात ते दोन पावले मागे घेतील.
भाजपमध्ये निष्ठावंताची गळचेपी होते, असे पत्रकारांनी विचारले असते ते म्हणाले, भाजपमध्ये निष्ठावंताना नेहमीच न्याय मिळतो. माझी गळचेपी झालेली नाही आणि होणारही नाही. पक्षाने मला विधान परिषदेवर पाठवून पुनर्वसन केले आहे. पक्षावर मी किंचितही नाराज नाही. मी लढवय्या असून येणार्या प्रसंगांना तोंड देतो.
राष्ट्रवादीच्या आमदारामुळे आवर्तन लांबले
कुकडीच्या पाण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, कुकडीच्या पाटपाण्यासंदर्भात कालवा समितीची 9 मे 2023 रोजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात 22 मे रोजी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. लगेच रोहित पवार यांनी तत्काळ ट्वीट करीत कुकडीचे पाणी सुटणार असल्याचे घोषित केले. माझा फोटो कट करून तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला.
मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी पाणी न सोडण्याबाबत आंदोलन केल्यानंतर आवर्तन लांबले. ही बातमी सोशल मीडियावर टाकण्याची तत्परता आमदार रोहित पवार यांनी दाखविली नाही. ती दाखविली असती तर शेतकर्यांना पाणी आवर्तन कोणामुळे थांबले हे समजले असते. आवर्तन लांबणीवर कोणामुळे पडले हे सांगायला आमदार रोहित पवार चाचरले, अशी टीका शिंदे यांनी केली.
कर्जतची ईश्वर चिठ्ठी आमच्या बाजूने..!
जामखेडपाठोपाठ कर्जतची ईश्वर चिठ्ठीही आमच्या बाजूने आहे. तिथेही नऊ-नऊ अशी परिस्थिती आहे. पण, मागे घडलेल्या घटना कोणही विसरत नाही, असे विखे यांचे नाव न घेत आमदार राम शिंदे म्हणाले.