पीक विम्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात 5.91 लाख नोंदणी

Crop Insurance
Crop Insurance

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने सुरू केलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 5 लाख 91 हजार शेतकर्‍यांनी नोंदणी केली, असे सांगत पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांना 15 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने देवून दिलासा दिल्याची माहिती महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली.

पालक मंत्री विखे पा. यांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ते बोलत होते. निवेदनांद्वारे नागरीकांनी दिलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी अधिकार्‍यांना तातडीने सूचना देवून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले. प्रधानमंत्री आवास योजना पथ विक्रेत्यांसाठी असलेल्या योजनेतील लाभार्थी व महिला बचत गटांना धनादेशाचे वितरण मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले.

केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला योजनेचा लाभ मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास' या मंत्राने योजनांची यशस्वी अंमलबजावणी गेल्या नऊ वर्षात केली आहे. कोव्हीड संकट आपण सर्वांनी अनुभवले. तेव्हापासून आज नागरीकांना मोफत धान्य मिळत आहे. घरकुल योजना, आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्य सुविधा नागरीकांना मिळत आहेत. आता राज्य सरकारने राज्यातील 12 कोटी नागरिकांना म. फुले जन आरोग्य मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला.

राज्यात शेतकर्‍यांना 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली. शेतकर्‍यांवर कोणताही अर्थिक बोजा येवू न देता या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. अ. नगर जिल्ह्यात 5 लाख शेतकर्‍यांचा सहभाग या योजनेत नोंदविण्यात आला. तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाई पोटी शेतकर्‍यांना 15 कोटी तर गारपीटीत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 56 लाख रुपयांची मदत सरकारने दिल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेच्या मनातील सरकार असल्याने सरकारकडून तसे निर्णय होत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते, हे जाणून घेण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम आहे. आमचे सरकार लोकांमध्ये जावून काम करणारे असल्याचा संदेश या माध्यमातून देत असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

पालक मंत्री विखे पा. यांनी हजारो नागरीकांचे अर्ज स्विकारले. शहरात उत्सव मंगल कार्यालयात नागरीकांनी निवेदन देण्यास मोठी गर्दी केली होती. प्रत्येक नागरीकांचा अर्ज स्विकारून प्रश्न समाजावून घेत त्यांनी अधिकार्‍यांना प्रश्न सोडविण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक पठारे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शहराध्यक्ष मारुती बिंगले, शरद नवले, केतन खोरे, संदीप चव्हाण, रवि पाटील, दता जाधव, प्रांताधिकारी किरण सावंत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्याचा सर्वात मोठा कार्यक्रम होणार शिर्डी येथे!

नागरीकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी 'शासन आपल्या दारी' उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू आहे. नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जावून हे महा जनसंपर्क अभियान सुरू केले. जिल्ह्याचा सर्वात मोठा कार्यक्रम शिर्डी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news