पवारांच्या भेटीनंतर लंके म्हणाले, अंगी बारा हत्तीचं बळ आलं! | पुढारी

पवारांच्या भेटीनंतर लंके म्हणाले, अंगी बारा हत्तीचं बळ आलं!

पारनेर (नगर) : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नगर-पारनेरचे आमदार नीलेश लंके ( MLA Nilesh Lanke ) यांच्या घरी अचानक भेट दिल्यानंतर संपूर्ण लंके कुटुंबीय भारावून गेले. आ. लंके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साहेबांच्या या भेटीने व आशीर्वादाने अंगी बारा हत्तीचं बळ आलं, असे त्यांनी नमूद केले आहे.

आमदार निलेश लंके ( MLA Nilesh Lanke ) यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय…

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये आमदार लंके नमूद करतात, ‘साहेब, तुम्ही नगर जिल्ह्यात येणार आहात तर तुम्हाला घरी यायचंय‘ ही विनंती ऐकल्यानंतर शरद पवार साहेबांनी हातातील कागदांमधून नजर वर करुन विचारले, कुणाच्या घरी? माझ्याच घरी मी उत्तर दिले. त्यासरशी त्यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांना डायरीत तशी नोंद करायला सांगितली. त्यानंतर ते जेंव्हा अहमदनगर जिल्ह्यात आले तेंव्हा तेथील कार्यक्रमात त्यांनी मला खास जवळ बोलावून. आपल्याला घरी जायचंय. तू माझ्या गाडीत बस, असे सांगितले.

पुढचे काही क्षण जणू मंतरल्यासारखे होते. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन साहेब घरी आले. माझ्या आई-वडिलांसोबत त्यांनी संवाद साधला. आम्हा उभयतांना आशीर्वाद दिले. घर तसे छोटेच आहे, वडिलांनी बांधलेले. त्याच घरात एका छोट्या खुर्चीवर साहेब बसले होते. साहेब कितीतरी वेळ फक्त घराकडे बघत होते. माझ्या वडिलांना त्यांनी हाताला धरुन जवळ बसवून घेतले. घरात कार्यकर्त्यांची रीघ लागलेली होती. आमचा छोटेखानी सत्कार स्वीकारला. पुंडलिकाच्या भेटीला जणू परब्रह्म आल्याची ही भावना होती. जवळपास अर्धा तास साहेब घरी थांबले. जेंव्हा परतीची वेळ आली तेंव्हा आपण सर्वजण मिळून एक फोटो घेऊयात असे ते आवर्जुन म्हणाले. साहेबांच्या सोबत एकाच फ्रेममध्ये येण्यासाठी भाग्य लागते.

हे भाग्य त्या मंतरलेल्या क्षणांनी आम्हा सर्वांना लाभले. आम्ही कृतज्ञ आहोत. इयत्ता तिसरी-चौथीमध्ये असताना शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला होता. आमदारकीच्या तिसरीत (तिसर्‍या वर्षाकडे जात असताना) शरद पवार साहेबांनी त्यानंतर आज माझ्या घरी येऊन आम्हाला सहकुटुंब आशीर्वाद दिले. आयुष्याचे सार्थक झाले. जनसेवेसाठी झुंजण्याचे, लढण्याचे बारा हत्तीचे बळ अंगात आले, अशा भावना आमदार लंके यांनी या पोस्टमध्ये नमूद करत शरद पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. सद्या ही पोस्ट व पवार भेटीचे व्हिडिओज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अधिक वाचा :

Back to top button