अहमदनगर : उसाच्या ट्रॉलीखाली सापडून तरुणीचा अपघाती मृत्यू

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा उसाच्या ट्रॉलीखाली सापडून मृत्यू झाला. वैष्णवी साहेबराव गुंजाळ (वय १९, रा. गुंजाळवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. ही विद्यार्थीनी संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.
अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरालगत गुंजाळवाडीच्या निर्मल नगरमध्ये राहत होती. शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन घराच्या दिशेने निघाली होती. जुन्या पोस्ट कार्यालयाजवळ तिच्यापुढे चाललेल्या उसाच्या ट्रॉलीला ओलांडून ती पुढे जात असताना समोरून अचानक बस आल्याने तिचा गोंधळ उडाला.
मात्र, डबल ट्रॉली असल्याने चालकाला मात्र काहीच समजले नाही. त्यामुळे तो आपले वाहन चालवतच राहिला. त्यातून ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूचा धक्का लागल्याने वैष्णवी ही दुचाकीसह खाली पडली आणि तिचे डोके ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून ती जागीच ठार झाली. वैष्णवी अपघातात मयत झाल्याची माहिती समजतात नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. तिचा मृतदेह संगमनेरच्या कुटीर रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
- FIFA WC 2022 : जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना; जाणून घ्या फिफाचे आर्थिक समीकरण
- Lionel Messi Interview : वर्ल्ड कप उंचावताना तुला डोळे भरून पाहयचंय! महिला पत्रकार भावूक (Video)
- Swiggy order@2022: भारतीयांनी २०२२ मध्ये काय काय मागवले?; Swiggy ने जाहीर केली ऑर्डर केलेल्या पदार्थांची यादी