

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : Ahmednagar :श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव जवळ असलेल्या कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक माहिती अशी की, कान्हेगाव येथे सकाळी काही लहान मुले तलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी गेली होती. यापैकी चैतन्य अनिल माळी (वय १२), दत्ता अनिल माळी (८) व चैतन्य शाम बर्डे (४) ही तीन लहान मुले खेळता-खेळता शेत तळ्याजवळ गेली. पावसाचे पाणी या तळ्यात साचलेले होते. त्यामुळे पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही व तीनही मुले पाण्यात बुडाली.
या घटनेची माहिती परिसरात पसरताच ग्रामस्थ गोळा झाले. तीनही मुलांचे शव बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक साळवे हे घटनास्थळी दाखल झाले. मृत तिन्ही लहान मुले गरीब कुटुंबातील आहेत. घटनास्थळी त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला होता.