कुटुंबाला न्याय मिळवून देणार : मुंडे | पुढारी

कुटुंबाला न्याय मिळवून देणार : मुंडे

करंजी पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्याच्या दौर्‍यावर आलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे नगरहून पाथर्डीकडे जात असताना, त्यांनी मंगळवारी देवराई येथे निवडणुकीच्या कारणावरुन ठार झालेल्या अजय गोरख पालवे या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी अजय पालवेची आई संजीवनी व आजी बबई पालवे यांचा आक्रोश पाहून पंकजा मुंडे यांनाही अश्रू अनावर झाले. ‘माझा मुलगा आता कधीही दसरा मेळाव्याला सावरगावला येणार नाही’, अशा शब्दात वडील गोरख पालवे यांनी हंबरडा फोडला.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘निश्चित तुमच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ. त्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांशी देखील चर्चा करेन. एखाद्याला कायमचे संपवून टाकण्यापर्यंतचे राजकारण कोणीही करू नये’, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी पालवे कुटुंबांला धीर देत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.

यावेळी पंकजा मुंडे यांच्यासमवेत खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष
अरुण मुंडे, माजी सभापती संभाजी पालवे, माजी उपसभापती भरत पालवे, अ‍ॅड. सतीश पालवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पालवे कुटुंबाला न्याय मिळावा देवराईत घडलेली घटना गंभीर असून, या घटनेत एका गरीब कुटुंबातील तरुणाचा जीव घेण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने अ‍ॅड. सतीश पालवे यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे यावेळी केली.

हेही वाचा

Back to top button