सोलापूर विद्यापीठाला ‘ऑक्सफर्ड’कडून निमंत्रण | पुढारी

सोलापूर विद्यापीठाला ‘ऑक्सफर्ड’कडून निमंत्रण

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून राबविण्यात आलेल्या ‘लोकल टू ग्लोबल शिक्षण’, स्किल कोर्सेस तसेच आरोग्य विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल जागतिक पातळीवरील नामांकित युरोपियन राष्ट्रांमधील अ‍ॅकॅडमिक युनियन ऑफ ऑक्सफर्ड संस्थेने घेतली आहे. यासाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना चर्चासत्रासाठी विशेष निमंत्रित केल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी दिली.

दि अ‍ॅकॅडमिक युनियन ऑफ ऑक्सफर्ड ही जागतिक पातळीवरील एक शैक्षणिक संस्था आहे. संपूर्ण जगातील साडेतीनशेहून अधिक विद्यापीठे तसेच संशोधन सेंटरशी ही संस्था जोडली गेली आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात जागतिक पातळीवर ही संस्था काम करते. अशा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेकडून सोलापूर विद्यापीठाची दखल घेण्यात आली आहे. ऑक्सफर्ड संस्थेकडून पुढील महिन्यात विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जगातील 54 देशांतील शिक्षणतज्ज्ञ तसेच शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. या 54 देशांमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची निवड करून नान्ीियपूर्ण उपक्रम व शैक्षणिक कार्याची माहिती सादर करण्यासाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना विशेष निमंत्रित केले आहे.

या चर्चासत्रामध्ये उच्च शिक्षण क्षेत्र व संशोधनाविषयी विस्तीर्ण चर्चा होणार आहे. अध्ययन तंत्रज्ञान, शैक्षणिक दर्जा, लोकल टू ग्लोबल एज्युकेशन आणि संशोधन कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचे, याविषयी संपूर्ण जगातील विविध राष्ट्रांमधील तज्ज्ञ यात चर्चा करून दिशा ठरविणार आहेत. यामध्ये सोलापूर विद्यापीठाचीही भूमिका मांडली जाणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

राज्यपालांकडून कौतुक व शुभेच्छा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ‘ऑक्सफर्ड’मध्ये होणार्‍या विशेष चर्चासत्रासाठी निवड झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांना दिली. सादरीकरणासाठी विशेष निमंत्रित केल्याचे सांगितले. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी कुलगुरूंचे अभिनंदन केले.

Back to top button