

सातारा; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे सातारा नगपालिकेसाठी सर्वाधिक 43 जागा खुल्या प्रवर्गासाठी तर 50 पैकी 25 जागा महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या. पहिलीच निवडणूक असल्याचे समजून काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जमाती प्रवर्गाची यावर्षीपासून नव्याने भर पडली. ओबीसी प्रवर्गाच्या 11 जागा रद्द होवून खुल्या जागांची संख्या वाढल्याने प्रस्थापितांसह इच्छुकांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
सातार्यातील शाहू कला मंदिर येथे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, मुख्याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण, महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग यासाठी आरक्षण कोटा निश्चित करण्यात आला. सातारा नगरपालिकेसाठी निवडणून द्यायची सदस्यसंख्या 50 आहे. यामध्ये अनुसूचित जाती सदस्यांच्या 6 जागांपैकी 3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. अनुसूचित जमातीसाठी 1 तर पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांसाठी 25 जागा राखीव ठेवण्यात आल्या. अनुसूचित जमातीसाठी एकच जागा असल्यामुळे आणि हद्दवाढीनंतर ही पहिल्यांदाच निवडणूक होत असल्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षण ड्रॉद्वारे चिठ्ठीतून काढण्याचे ठरले. ही जागा अनुसूचित जमाती (एसटी) महिलेसाठी आरक्षित झाल्यास सर्वसाधारण महिला प्रवर्गातील एक जागा कमी होईल किंवा संबंधित जागा एससी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाली तर ते सर्वसाधारण प्रवर्गाची जागा कमी होईल, असे अभिजीत बापट यांनी सांगितले.
द्विसदस्यीय प्रभाग रचना असल्यामुळे एका प्रभागात दोन नगरसेवक सदस्य आहेत. 'अ' व 'ब' अशी प्रभागाची रचना असून प्रभागातील या दोन्ही जागेसाठी आरक्षण सोडतीची कार्यवाही त्यानंतर सुरु करण्यात आली. अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या टक्केवारीवरुन त्या-त्या प्रभागाचे आरक्षण काढण्यात आले. प्रभाग क्र. 2, 3, 4, 8, 13 आणि 15 हे सहा प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. यापैकी तीन प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती लोकसंख्येचा प्रभाग क्र. 2 होता. आयोगाच्या सूचनेनुसार आरक्षणाची सर्वाधिक लोकसंख्या असलेला एकच प्रभाग आला तर त्यामध्ये सर्वाधिक टक्केवारी असलेल्या प्रवर्गासाठी तो राखीव ठेवण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आहे आहे. अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या प्रभाग क्र. 2 मध्ये आहे. त्यामुळे हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी निश्चित करण्यात आला. उतरत्या क्रमाने जादा लोकसंख्या असल्याने प्रभाग क्र. 1 हा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव झाला. यामध्ये महिला व सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित करण्याची कार्यवाही त्यानंतर सुरु झाली. हद्दवाढ व कायद्यात दुरुस्ती होवून नगरसेवक संख्येत वाढ झाली. त्याशिवाय दोन प्रभाग नवे झाले. त्यामुळे ही निवडणूक पाहिलीच आहे असे समजून आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आरक्षण सोडतीला पूर्वीचे आरक्षण आणि चक्राकार पध्दतीने सोडत हे नियम लागू
राहणार नसल्याचे अभिजीत बापट यांनी स्पष्ट केले. चिठ्ठ्या ड्रममध्ये टाकण्यात आल्या. अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण काढण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यातून अनुसूचित जाती प्रवर्गाचे महिला व सर्वसाधारण आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. महिला प्रवर्गाचे आरक्षणही काढल्याने उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याचे स्पष्ट झाले. नगरपालिका हद्दवाढ झाल्यामुळे यावर्षीपासून अनुसूचित जमाती प्रवर्गाची भर पडल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी उपस्थितांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले.
यावेळी निवडणूक शाखेचे मोहन प्रभुणे, विश्वास गोसावी, एकनाथ गवारी, अतुल दिसले, शैलेंद्र अष्टेकर, सचिन म्हस्के, नगरसेवक अमोल मोहिते, अविनाश कदम, शेखर मोेरे-पाटील, विजय काटवटे, अॅड. बाळासाहेब बाबर, भालचंद्र निकम, संजय साठे, राजू गोरे, राम हादगे, सचिन सारस आजी-माजी नगरसेवक व नागरिकउपस्थित होते.?
सातारा नगरपालिका आरक्षण सोडतीवेळी शहरातील मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत हा जिव्हाळ्याचा विषय असला तरी दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी या सोडतीकडे पाठ फिरवली होती. अपवाद वगळता कुणी नगरसेवक फिरकला नाही. भाजपच्याबाबतीतही हीच परिस्थिती राहिली. खुल्या प्रवर्गाच्या जागा वाढल्याने आरक्षण सोडतीत कुठले प्रभाग आरक्षित होतील, याचा अंदाज आल्यानेही नगरसेवक गैरहजर राहिले, अशी चर्चा सुरू होती.