

संगमनेर : गोरक्ष नेहे: स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही संगमनेर तालुक्यातील रामेश्वरदरा या आदिवासी पाड्यातील मुलांना शाळेत जाण्यास धड रस्ताच नसल्याने आपल्या मुलांचे दाखले शाळेतून काढण्याची दुर्दैवी वेळ ओढावल्याने संताप व्यक्त होत आहे. एकीकडे निवडणुका जवळ आल्या की, विविध राजकीय पक्षांचे नेते विकासाच्या गप्पा मारतात. रस्ते, वीज, पाणी या सुविधांना प्राधान्य देतात.
मात्र संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगाव पठार गावांतर्गत असलेल्या धादवडवाडी परीसरातील रामेश्वरदरा या आदिवासी पाड्यात रामेश्वरदरा भागातील मुलांना तब्बल दीड किलो मीटरचे अंतर चालावे लागते. डोंगर, दर्या, खोर्यातून वाट काढत डोंगर चढून ही धादवडवाडी येथे शाळेला जातात. मुलांना शाळेत जाण्या- येण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून लोकसहभागातून येथे रस्ता तयार केला.
अनेक वर्षे मुले याच रस्त्याचा वापर करत होते, मात्र प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था होते. त्यामुळे या रस्त्यावरुन पायी चालणेसुद्धा कठीण होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा स्वखर्चाने हा रस्ता दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्ता वनविभाग हद्दीतून जात असल्यामुळे या रस्त्याचा दोन- तीन वेळा प्रस्ताव तयार करुन मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न केला , मात्र या रस्त्याकडे पं. स. सदस्य, जि. प. सदस्य आदी लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. यामुळे अखेर वैतागलेल्या आदिवाशी बांधवांनी केवळ रस्त्याच्या सुविधेअभावी मुलांचे दाखले शाळेतून काढून घेतले.
आता दुसर्या गावातील शाळेत त्यांची नावे दाखल करणार असल्याचे काही स्थानिकांनी सांगितले. काहींना तर रामेश्वर दरा कुठे आहे, हेच माहित नसेल, अशी बिकट अवस्था आहे. आमच्या येथे सर्वच आदीवासी मंडळी असल्याने विकासच जातीयवादी होत आहे की काय, केवळ निवडणुका आल्या की, राजकीय मंडळी मतांचा जोगवा मागण्यासाठी रात्री- अपरात्री आमच्याकडे येतात, मात्र निवडणुका झाल्या की, ते आश्वासने विसरतात. काही लोकप्रतिनिधी खुर्चीचा वापर सत्तेसाठी करतात.
त्यांना सर्वसामान्य नागरिकांचे काही एक घेणे-देणे नसते, असा आरोप साईनाथ धादवड, शांताराम धादवड, उल्हास धादवड, नारायण धादवड, दत्ता धादवड, सोमनाथ धादवड, विक्रम पांडे, संजय पांडे, अमित पांडे, मधुकर धादवड, साखरचंद धादवड, राजेंद्र धादवड, प्रकाश पांडे, मयुर धादवड आदींनी राजकर्त्यांवर केला आहे.
घसरुन पडल्याने चिमुरड्याचा हात मोडला..!
रामेश्वरदरा भागातील वैभव धादवड या चिमुकल्याचा तीन महिन्यांपूर्वी या अत्यंत निकृष्ट रस्त्याने डोंगर- दर्यातून शाळेत जाताना निसरड्या रस्त्यावरून घसरून पडल्याने हात मोडल्याचे आदिवाशी पाड्यातील बांधवांनी सांगितले.
60 वर्षात प्रश्न मार्गी लावता आला नाही..!
माळेगाव पठार गावातील ग्रामपंचायतची स्थापना होऊन 60 वर्षे झाली. आत्तापर्यंत अनेक सरपंच आले आणि गेले, मात्र आजपर्यंत आमच्या रस्त्याचे काम एकाही सरपंचाला मार्गी लावता आले नाही, अशी निराशा काही पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.