समाविष्ट गावांवरून ‘पत्रापत्री’; 23 गावांतील मिळकतींच्या ताब्यावरून महापालिका-जिल्हा परिषदेत जुंपली | पुढारी

समाविष्ट गावांवरून ‘पत्रापत्री’; 23 गावांतील मिळकतींच्या ताब्यावरून महापालिका-जिल्हा परिषदेत जुंपली

हिरा सरवदे

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांमधील शासकीय मालमत्ता आणि मिळकतींचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. मिळकतींच्या ताब्यासाठी जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले. तर दुसरीकडे गावांचा समावेश झाला, तेव्हाच सर्व दप्तर महापालिकेकडे गेल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेने दिले आहे.

राज्य शासनाने म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक नर्‍हे, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी-सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली या 23 गावांचा 30 जून 2021 रोजी महापालिकेत समावेश केला.

सहकुटुंब सहपरिवार : मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन

यानंतर ग्रामपंचायतीमधील सर्व दप्तर महापालिकेने ताब्यात घेतले. गावांच्या समावेशामुळे ग्रामपंचायत कार्यालय, मंदिरे, पाण्याच्या टाक्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, समाजमंदिरे, विरंगुळा केंद्रे, बखळ गावठाण, अंगणवाड्या, स्मशानभूमी, शाळा, बाजार मैदाने, शौचालये, गांडूळ खत प्रकल्प, पंप हाऊस, कुस्ती आखाडा, दशक्रिया विधी घाट, स्टोअर रूम, शेड पार्किंग, जकात नाका, गाळे, पशुसंवर्धन दवाखाने, हातपंप, बोअरवेल, उद्याने, विहिरी, तलाव, जमीन, गायरान अशा मिळकती व मालमत्ता आपोआप महापालिकेच्या ताब्यात येतात.

ही गावे महापालिकेत येऊन 11 महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, या गावांतील किती मालमत्ता व मिळकती ताब्यात आल्या, याची माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही. महापालिकेकडे केवळ गावांमधील 104 शाळांचीच माहिती आहे. या संदर्भात अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, गावांमधील शासकीय व ग्रामपंचायतीच्या मिळकतींची व मालमत्तेची माहिती आणि ताबा जिल्हा परिषदेकडे मागितला आहे.

याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून मालमत्तेचे मूल्यांकन करून घ्यावे आणि शासकीय दरानुसार जिल्हा परिषदेत रक्कम भरावी, असे पत्र महापालिकेला देण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणूक : राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी केले पहिले मतदान 

समाविष्ट 11 गावांमधील स्थिती काय आहे?

समाविष्ट 11 गावांमध्ये एकूण 361 मालमत्ता व मिळकती आहेत. यापैकी 251 महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत, तर 110 ताब्यात येणे बाकी आहे. फुरसुंगीतील 74 पैकी केवळ 18 मिळकती महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. अद्याप 56 ताब्यात येणे बाकी आहे. तसेच उरुळी देवाची येथे 91 पैकी 62 ताब्यात आल्या असून, अद्याप 29 ताब्यात येणे बाकी आहे. याशिवाय उत्तमनगर (8), शिवणे (16) या गावांतील एकही मालमत्ता महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही.

समाविष्ट 23 गावांमधील शासकीय व ग्रामपंचायतींच्या मालमत्तेची व मिळकतींची माहिती आणि ताबा देण्यासाठी जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्याकडून या मिळकतींचे मूल्यांकन करून त्याची शासकीय दरानुसार रक्कम भरण्याचे पत्र देण्यात आले आहे. यामुळे गावांमधील मिळकतींचा ताबा आणि माहिती महापालिकेकडे नाही.

        राजेंद्र मुठे, मालमत्ता विभागाचे प्रमुख, महापालिका

महापालिका हद्दीमध्ये ज्यावेळी गावांचा समावेश झाला त्याचवेळी ग्रामपंचायतींचे सर्व दप्तर महापालिकेच्या ताब्यात गेले आहे. त्यामध्ये सर्व मालमत्ता व मिळकतींची माहिती आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार समाविष्ट गावांमधील केवळ शाळांच्या इमारतींसाठी जिल्हा परिषदेने जो साडेतीन कोटी रुपये खर्च केला आहे तो भरण्यासंदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. इतर कोणत्याही मालमत्तेच्या किंवा मिळकतीच्या रकमेची मागणी महापालिकेकडे केलेली नाही.

       आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

 

 

Back to top button