…अखेर नान्नजला गणाचा मान, जवळा गटातून सुटका; नागरिकांमधून समाधान

…अखेर नान्नजला गणाचा मान, जवळा गटातून सुटका; नागरिकांमधून समाधान
Published on
Updated on

लियाकत शेख

नान्नज : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जामखेड तालुक्यात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढणार असल्याने तालुक्यातील नान्नज गावाला गट किंवा गणाचा मान मिळणार याबाबत 'पुढारी'ने 29 नोव्हेंबर 21 रोजी 'नान्नजला मिळणार गट, गणाचा मान' या मथळ्याखाली सहा महिन्यापूर्वी वृत्त प्रकाशित केले होते. अखेर नान्नज गावची जवळा गटातून सुटका होऊन खर्डा गटात स्वतंत्र नान्नज गणाचा मान मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

तालुक्यात लोकसंख्येच्या मानाने खर्डा, नान्नज, जवळा, अरणगाव, सोनेगाव, साकत ही गावे तालुक्यात मोठी आहेत. तालुक्यात जामखेड ही एकच नगरपरिषद आहे. तालुक्यात 58 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीअंतर्गत एकूण एक लाख 18 हजार 829 इतकी लोकसंख्या आहे.

येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी या लोकसंख्येतून तीन जिल्हा परिषद गट, सहा पंचायत समितीचे गणाचे नियोजन केले असून, सन 2015 पूर्वी जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे जामखेड, खर्डा, जवळा, असे तीन गट होते, तर खर्डा, सोनेगाव, जवळा, अरणगाव, जामखेड, साकत, असे पंचायत समितीचे सहा गण होते. सन 2015ला जामखेड ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर झाले. यामुळे जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण कमी झाले.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत जवळा जिल्हा परिषद गटातून सोमनाथ पाचारणे, तर खर्डा जिल्हा परिषद गटातून वंदना लोखंडे यांनी बाजी मारली. ही दोन्ही जिल्हा परिषद सदस्य भाजपने निवडून आली, तर यावेळी पंचायत समितीच्या निवडणुकीत पंचायत समितीचे चारही सदस्य भाजपचेच विजयी झाले. सुरुवातीला अडीच वर्ष सभापती सुभाष आव्हाड यांनी पंचायत समितीचा कारभार चालविला, तर नंतर राजकीय घडामोडी होऊन राजेश्री सूर्यकांत मोरे या सभापतिपदी झाल्या. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यात नव्याने एक जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे दोन गण वाढणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 30 ते 35 वर्षांपूर्वी नान्नजला जिल्हा परिषद गटाचा मान होता. नान्नज गावालगत असणार्‍या पाच वाड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाल्याने नान्नजचा जिल्हा परिषद गटाचा मान गेला.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत थोड्या लोकसंख्येच्या कमतरतेमुळे नान्नजचा जिल्हा परिषद गटाचा मान हुकला होता. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढणार असल्याने गट व गणाच्या मानासाठी नान्नजच्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अखेर खर्डा गटात नान्नजला गणाचा मान मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

अन् धूर्त राजनीतीतून सुटका झाली!

अनेक वर्षांपासून जवळा गटात नान्नज गावचा समावेश होता. या दोन्ही गावांची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे; मात्र जवळा गावची एक ख्याती अशी की, उमेदवार कोणीही असो, तसेच तो कोणत्याही पक्षाचा, असो याचा विचार न करता आपल्या गावचा व्यक्ती निवडून आला पाहिजे, यासाठी एकजूट करून अनेक वेळा नान्नजच्या उमेदवारांवर पराभवाची वेळ आणली गेली. गेली अनेक वर्षांपासून नान्नजचा एकही उमेदवार जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा सदस्य होऊ शकला नाही. या जवळा गावच्या धूर्त राजनीतीपासून नान्नजकरांची आता सुटका झाली आहे. खर्डा गटात नान्नज गावाला स्वतंत्र गणाचा मान मिळाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

नान्नज गणातील गावे

नान्नज, पोतेवाडी, वाघा, पिंपळगाव उंडा, तरडगाव, वंजारवाडी, दौंडाचीवाडी, सोनेगाव, जवळके, धनेगाव, चोभेवाडी, मुंजेवाडी, बोरले, गुरेवाडी, महारुळी, अशा 12 ग्रामपंचायतीसह 15 गावांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news