

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसने या देशाला महासत्ता बनवण्याचे काम केले, मात्र भाजपने हाच देश विकण्याचे काम करत आहे. काही लोक स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी धर्माचे बाजारीकरण करू पहात आहेत. देशावरचं कर्ज फेडण्यासाठी देशाच्या मालमत्ता विकण्याचा घाट मोदी सरकार घालत आहे. देश वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. काँग्रेसच्या नादाला लागणार्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित नवसंकल्प शिबिराच्या सांगता सभेत पटोले बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रभारी पाटील, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आशिष दुवा, आ. लहू कानडे यावेळी उपस्थित होते. प्रास्तविक डॉ. सुधीर तांबे यांनी केले तर आभार आ. लहू कानडे यांनी मानले.
पटोले म्हणाले, देशातला शेतकरी संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाजप करीत आहे. देशात महागाई वाढली आह .पद्धतशीरपणे ओबीसी आरक्षण टाळण्याचे काम त्यांनी केले आहे. प्रभारी एच.के.पाटील यांनी साईबाबांच्या पावन भूमीत चिंतन शिबिराचे आयोजन झाले, त्या साईबाबांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे. तेच माणसं जोडण्यासाठी काँग्रेसचे 'भारत जोडो'चे अभियान साईंच्या पावन भूमीतून सुरू होत आहे, यापेक्षा विलक्षण योगायोग असू शकत नाही. म्हणून हे अभियान यशस्वी होणार असा निर्धार पाटील यांनीकेला.
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, साईबाबांच्या शिर्डीत येऊन आपण जो संकल्प केला तो संकल्प आपणास सिद्धीस न्यायचा आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात महागाई वाढते आहे. इंधनाचे दर वाढले आहे. गरिबांचे जीवन कठीण होत असताना केंद्र सरकार त्यांच्या विचार करत नाही. यंदा उसाचे उत्पादन वाढलं तर लगेच साखरेची निर्यात बंदी केली. गव्हाचे उत्पादन वाढलं लगेच निर्यातबंदी केली. मात्र परदेशातून कांदा आणला त्यांना पाकिस्तानचा कांदा चालतो.
आमचा कांदा नाही चालत. देशाचं हिताच बोलण्यार्यावर लगेच इडीच्या धाडी टाकतात. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी 100 दिवसाचा कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आजच रस्त्यावर उतरून लोकांसोबत जाऊन विजयाची संधी उपलब्ध होणार आहे.