मिरजेत अवैधधंदे जोमात | पुढारी

मिरजेत अवैधधंदे जोमात

मिरज : स्वप्निल पाटील
‘आरोग्य पंढरी’ आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या मिरजेला आता ‘अवैधधंद्यांची’ लागण झाली आहे. अवैधधंद्यांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा असताना देखील रोग्यांकडून बिनदिख्खतपणे अवैधधंद्याचा फैलाव करून मिरज शहराचा ‘बट्ट्याबोळ’ केला आहे. यातूनच दररोज एकमेकांवर हल्‍ले करून एकमेकांचा काटा काढण्यासाठी आता सरसावले असल्याचे दिसून येते.

मिरज हे एकेकाळी राज्यात आरोग्य पंढरी आणि सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून ओळखले जायायचे. परंतु, आता अवैधधंद्याचे माहेरघर म्हणून याची ओळख महाराष्ट्रात होवू लागली आहे. देशभरात चालणारे सर्व अवैधधंदे येथे चालतात, हे सर्वश्रृत आहे. गांजा, गुटखा, अंमली पदार्थाच्या तस्करीसोबत गॅस रिफिलिंग, हॉटेलमध्ये चालकणारे क्रिकेट बेटिंग, जुगार अड्डे, वेश्या व्यवसाय इत्यादी अवैधधंदे येथे जोमात चालतात. अर्थात हे धंदे कोठे चालतात, हेदेखील सर्वांना माहिती आहे.

मिरजेत पूर्वी केवळ चंदन आणि गावठी दारूची तस्करी चालायची. परंतु गांजा, गुटखा, जुगार अड्डे, कॅसिनो, क्रिकेट बेटिंग इत्यादी अवैधधंद्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या मिरजेची राखरांगोळी झाली आहे. शहरातील सर्व अवैधधंदांना ऊत आला आहे. अंदर-बाहर जुगार, गोव्यात मोठ्या प्रमाणात चालणारा कॅसिनो आणि महत्वाचे म्हणजे क्रिकेट बेटिंग हेदेखील येथे सुरू आहे. पूर्वी बनावट लॉटरी तिकीटाचा व्यवसाय करणारा आता हॉटेलच्या नावाखाली क्रिकेट बेटिंगचा धंदा मांडल आहे. मिरजेत घेतल्या जाणार्‍या क्रिकेट बेटिंगमध्ये कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात बेटिंग लावले जाते. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी छापेमारी केली, परंतु याबाबत मिरजेतील पोलिसांना मात्र याचा थांगपत्ताच लागला नव्हता.

शहरातील जुगार अड्ड्यांमध्ये गुन्हेगारांसह व्हाईटकॉलर राजकारण्यांचे देखील हात गुरफटले आहते. सांगली, मिरज शहरासह आसपासच्या गावातील तरुण या ठिकाणी येतात, पैसे लावतात, पैसे हारल्यावर क्‍लबची तोडफोड करतात. यातून दोन्ही गटांत तुफान राडा होता. परंतु, पोलिसांत तक्रार न करता असली प्रकरणे पोलिस ठाण्याच्या बाहेरच आपापसात मिटविली जात आहेत. त्यामुळे कारवाईचा तर प्रश्‍नच येत नाही. तसेच शहरात गांजा आणि गुटखा विक्रीदेखील जोमात सुरू आहे. मिरजेत काहीजणांकडे गांजा मिळतो, परंतु ते यंत्रणेच्या गोटातील असल्याने कारवाई होत नाही. अर्थात हा गांजा नवख्या माणसाला मिळत नाही, रोजच्या व्यवहारातील व्यक्तीलाच तो दिला जातो. गुटखा विकणार्‍या किरकोळ पानटपरीवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते. व्यावसायिकांवर कारवाई करण्याची वेळ आल्यावर मात्र ही यंत्रणा मूग गिळून गप्प असते.

नुकतेच मिरजेपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या एका फार्महाऊसवर अंमली पदार्थ बनविले जात असल्याच्या संशयातून पुणे येथील सीमा शुल्क विभागाने छापा टाकला. तेथून 22.83 किलो गांजा जप्त करण्यात आला. वड्डीतील माहिती पुण्यात कळते. स्थानिक यंत्रणेला याचा सुगावा देखील लागत नाही, हे नवलच! आता मिरजेत चालणार्‍या सार्‍या अवैधधंदामुळे शहराची ओळख ‘अवैधधंद्यांचे’ शहर म्हणून झाली आहे. ती पुसून काढणे गरजेचे आहे. त्यामुळे अवैधधंद्यांवर केवळ जुजबी कारवाई करण्यापेक्षा यंत्रणेने जालीम औषध वापरण्याची गरज आहे.

रेल्वे तिकीटाचा काळाबाजार

मिरज आणि इचलकरंजी ही दोन शहरे रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मिरज हे मध्य रेल्वेचे शेवटचे आणि दक्षिण-पश्‍चिम रेल्वेला जोडणारे महत्वाचे स्थानक आहे. यामुळे येथून जाणार्‍या लांबपल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी अनेक प्रवासी काळाबाजार करणार्‍यांवर पायघड्या घालतात. त्यांनीदेखील शहरात बस्तान बसविले आहे. रेल्वेत खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यात वाद झाल्याने इचलकरंजीमधील एकाचा खूनदेखील करण्यात आला होता. यापूर्वी हद्दपार असलेल्या राजकीय नेत्याने स्थानक परिसरात बस्तान बसविले होते. त्याने रेल्वेत व रेल्वे स्थानकाबाहेर उद्योग सुरू करून मोठी माया जमवली असल्याची चर्चा आहे.

जीवाशी खेळणारे गॅस रिफिलिंग

अवैधंद्यापैकी एक असलेले गॅस रिफिलिंग. यापूर्वी होत नव्हते. परंतु आता सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी भारतनगर भागात रिक्षात गॅस रिफिलिंग करीत असताना स्फोट झाला होता. यामध्ये दोघांचा होरपळून मृत्यू तर अर्धा डझनभर नागरिक जखमी झाले होते.

क्‍लब, बेटिंगमधून वारंवार हाणामार्‍या

शहरात सुरू असणारे क्‍लब आणि क्रिकेट बेटिंग अ‍ॅपमधून दररोज मारामार्‍या होत आहेत. शहरातील एका हॉटेलजवळ क्रिकेट बेटिंगचे पैसे दिले नाहीत म्हणून काही गुडांनी एकास जबर मारहाण केली होती. त्यानंतर महात्मा गांधी चौकात सुरू असणार्‍या क्‍लबमध्ये देखील वारंवार हाणमारी होत आहे. परंतु हे प्रकरण पोलिसात जात नसल्याने यावर कोण कारवाई करणार, हा देखील मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे शहरात सुरू असणार्‍या क्‍लब आणि क्रिकेट बेटिंगमधून वारंवार मारामार्‍या होत असल्याचे दिसून येते. रविवारी मध्यरात्री क्‍लब आणि बेटिंग या गटात तुफान राडा झाला. घरावर दगडफेक करून वाहने फोडण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.

दारू विक्री जोमात : यंत्रणा कोमात

शहरात गावठी, हातभट्टी, गोवा बनावटीची आणि हुबळी बनावटीची दारू विक्री जोमात आहे. काही बारवाल्यांकडे संबंधित यंत्रणेशी संगणमत असलेल्या एका ‘झिरो’ची उठबस असते. ती कशासाठी असते हे मात्र सांगता येत नाही. या विभागाडून वर्षातून एकदा मोठी कारवाई करण्यात येते. त्यानंतर मात्र कारवाई थंडच आहे. शहरातील एका भागात वर्षानुवर्षे हातभट्टी दारू विकली जाते. त्यावर कारवाई होते. परंतु आता हातभट्टी दारू विकण्याचा त्यांचा व्यवसायच झाला आहे. शहरात येणार्‍या आणि विक्री होणार्‍या अवैध दारू विक्रीवर आता संबंधित यंत्रणेने कारवाई करण्याची गरज आहे.

Back to top button