

नगर : पुढारी वृत्तसेवा
नगर विभागाच्या 482 बस दररोज प्रवाशी घेऊन 1 लाख 71 हजार किलोमीटर धावत आहेत. विभागाला दररोज सरासरी 62 लाखांचे उत्पन्न उपलब्ध होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची बस टॉप गिअरमध्ये धावू लागली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पहिला आर्थिक फटका कोरोना संसर्गाने दिला आहे. तब्बल तीन महिने बससेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे महामंडळाचे दररोजचे 65 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न बुडाले.
राज्य शासनाने त्यानंतर कोरोना निर्बंध कमी केले. त्यामुळे काही बस रस्त्यांवर धावू लागल्या. परंतु कोरोना संसर्गामुळे जनता बाहेर पडत नव्हती. त्यामुळे नोकरदार वगळता एसटीला कोणी प्रवाशी मिळत नव्हते. त्यामुळे बस मोकळ्याच धावत होत्या. कालांतराने हळूहळू महामंडळाच्या बसला प्रवाशी मिळू लागले. 40 लाखांपर्यंत उत्पन्न मिळत असतानाच, एसटी महामंडळाच्या कामगारांनी शासनात विलीनिकरण करण्यात यावे, या मागणीसाठी संप पुकारला.
पहिले दोन महिने बससेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले. त्यानंतर काही कामगार रुजू झाले. त्यामुळे पुन्हा शंभर-दीडशे गाड्या धावू लागल्या. न्यायालयाने कामावर हजर होण्याचे आवाहन केल्यानंतर दोन कामगार वगळता 3 हजार 800 कामगार कामावर हजर झाले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून महामंडळाच्या नगर विभागाच्या बस हाऊसफूल धावत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून 482 बस धावत असून, दररोज 62 लाख रुपये उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा होत आहे.
तारकपूर 59, शेवगाव 45, जामखेड 41, श्रीरामपूर 40, कोपरगाव 55, पारनेर 39, संगमनेर 44, श्रीगोंदा 50, नेवासा 36, पाथर्डी 46, अकोले 37.