सांगली : पोलिसांवर दगडफेकप्रकरणी 22 जणांवर गुन्हा | पुढारी

सांगली : पोलिसांवर दगडफेकप्रकरणी 22 जणांवर गुन्हा

जत : पुढारी वृत्तसेवा :  जाडरबोबलाद (ता. जत) येथे माजी सभापती तम्मणगौडा रवि पाटील गटाची सर्व सेवा सोसायटीची प्रचारसभा सुरू असताना प्रचारसभेत विरोधी अंकलगी गटाने तुफान दगडफेक केली. यामध्ये एका पोलिस अधिकार्‍यासह पाच पोलिस  कर्मचार्‍यांवर दगडफेक केली. जितेंद्र महादेव अंकलगी याच्यासह 22 जणांवर उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले.

संशयितांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, पोलिस कॉन्स्टेबल विक्रम घोदे, पोलिस हेड कॉन्स्टेबल भगवान कोळी, नामदेव काळेल, सिद्धेश्‍वर मोरे, पोलिस नाईक हरी खंडागळे हे गंभीर जखमी झाले. याबाबत विक्रम घोदे यांनी बावीस जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जाडरबोबलाद सोसायटीची निवडणूक सुरू आहे. सोसायटीच्या प्रचाराकरिता मल्लिकार्जुन शेतकरी पॅनेलच्या अंकलगी गटाने गुरुवारी सायंकाळी आयोजित केलेल्या प्रचारसभेत विरोधी पॅनेलप्रमुखावर टीका केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील प्रचारसभेत मार्गदर्शन करीत होते. दरम्यान, विरोधी गटातील मार्केट कमिटीचे माजी संचालक महादेव अंकलगी यांचे पुत्र जितेंद्र अंकलगी याने सभेच्या दिशेने दगड फेकला.

यावेळी पोलिस कॉन्स्टेबल विक्रम घोदे यांनी त्यास शांततेचे आवाहन केले व अटकाव करीत असताना अंकलगी गटाच्या पॅनेलचे जगदेव बिरादार, धरेश बिराजदार, निखिल बिरादार, आनंदराया बिरादार, विनोद कत्ते, विकास कत्ते, सिद्धाप्पा आराणी, रेवनसिद्ध आराणी, प्रकाश आराणी, महेश आराणी, जगदेव बिरादार, शिवानंद बिरादार, शिवानंद मल्लाशाप्पा बिरादार, प्रकाश मलाबादी, शिवगोंडा बिरादार, प्रदीप धुमगोंड, लायप्पा बिरादार, जिनेसाब मनेरी, धुळप्पा आराणी, सादिक जमादार यांच्यासह अनोळखी दहा ते पंधराजणांनी दगडफेक व काठीने हल्ला करणे सुरूच ठेवले. दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षक खरात यांच्यासह पाच पोलिस गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी बावीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.

Back to top button