पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे कामास ब्रेक; खेड तालुक्यात लष्कराकडून आक्षेप | पुढारी

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे कामास ब्रेक; खेड तालुक्यात लष्कराकडून आक्षेप

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा

बहुचर्चित, बहुप्रतिक्षेतील पुणे-नाशिक हा दे शातीलपहिलाच सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला निती आयोगासह केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर वेगात काम सुरू झाले होते. मात्र, हे काम खेड तालुक्यात पोहोचताच लष्कराने त्यावर आक्षेप नोंदवून काम बंद पाडले. अखेर गेल्या महिनाभरापासून वेगात सुरू असलेल्या या कामाला लाल कंदील (रेड सिग्नल) मिळाला. खेड तालुक्यातून जाणारा हा रेल्वेमार्ग भारतीय लष्कराच्या स्फोटके नष्ट करण्याच्या जागेतून जात असल्याने हा आक्षेप घेण्यात आला आहे.

दरम्यान, रेल्वे प्राधिकरणाने लष्कराची जागा सोडून अन्य पर्यायांचा विचार सुरू केल्याने नाशिक-पुणे महानगरांदरम्यानच्या या रेल्वे मार्गाचे स्वप्न सध्या तरी लांबले आहे. महाराष्ट्र सरकार व रेल्वे मंत्रालयाचा 16 हजार 39 कोटी रुपयांचा हा संयुक्त उपक्रम आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय निती आयोग आणि रेल्वे मंत्रालयाने एकाच दिवशी बहुप्रतीक्षित असलेल्या या पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी दिली होती.

त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून मिळणार्‍या 20 टक्के निधीचा मार्ग मोकळा झाल्याने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (महारेल) पुण्यापासून नाशिककडे वेगाने काम सुरू करण्यात आले होते.  मात्र, हे काम खेड तालुक्यात पोहोचताच भारतीय लष्कराने या रेल्वेमार्गावर आक्षेप घेतला. महारेलने आता खेडमधील काम थांबविले असून, पर्यायी जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना संरक्षण विभागाने कोणताही आक्षेप घेतला नव्हता.

आता या रेल्वेमार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असताना लष्कराने स्फोटके नष्ट करण्याच्या कामात अडथळा ठरेल, असे कारण सांगत त्यावर आक्षेप नोंदविल्याने महारेलला खेडमधील काम थांबवावे लागले. आता पुणे प्रशासनाकडून संरक्षण विभागाची जागा सोडून पर्यायी जागेची पाहणी सुरू झाल्याने नियोजित वेळेपेक्षा हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच लांबण्याची शक्यता आहे. आता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, रेल्वे अधिकारी अजय जैस्वाल यांच्याशी चर्चा करून तोडगा काढतील.

पुण्याने घेतली आघाडी..!

या रेल्वेमार्गासाठी आवश्यक जमीन शेतकर्‍यांकडून थेट खरेदीखत करून घेतली जाणार आहे. यात तीन्ही जिल्ह्यात पुण्याने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत 26 खरेदीखतांची नोंदणी झाली आहे.

होणार 41 उड्डाणपुलांची रचना !

या मार्गावर वंदेभारत ही स्वदेशी रेल्वेगाडी ताशी 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. यासाठी दुहेरी मार्गिका तयार करून त्यांचे विद्युतीकरण केले जाणार आहे. देशातील पहिलाच सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग ठरणार्‍या पुणे-नाशिक या प्रकल्पात एकूण 19 छोटे-मोठे बोगदे, 41 उड्डाणपूल व 128 ठिकाणी भुयारी मार्गांची रचना केली जाणार आहे.

Back to top button