नाशिक : आदिवासी कला, संस्कृतीच्या संवर्धनासाठी आजपासून पाच दिवस जागर | पुढारी

नाशिक : आदिवासी कला, संस्कृतीच्या संवर्धनासाठी आजपासून पाच दिवस जागर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी विकास विभाग व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने गोल्फ क्लब मैदान येथे शुक्रवार (दि.27) पासून पाचदिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यातील आदिवासी रुढी, पंरपरा, कला व संस्कृती यांचे संवर्धन व प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे. नागरिकांना विविध आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते व विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी 6 वा. होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त हिरालाल सोनवणे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंघला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील आदिवासी सांस्कृतिक मूल्यांची आवड असणार्‍या नागरिकांसाठी पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ, दागदागिने, वारली चित्रकला, गवताच्या वस्तू, वेतकाम, बांबूकाम, काष्टशिल्पे, धातूकाम, मातीकाम, वनौषधी, लाकडी व लगद्याचे मुखवटे आदी खरेदी करता येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त
डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे.

असे असणार कार्यक्रम – आदिवासी हस्तकलांचे भव्य प्रदर्शन व विक्री, महाराष्ट्रातील आदिवासी जमातीची पारंपरिक वेशभूषा व सांस्कृतिक वारसा दर्शविणार्‍या आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा, तसेच आदिवासी जीवन, कला व संस्कृती यावर आधारित आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून प्रदर्शित आदिवासी लघुपट महोत्सव.

हेही वाचा:

Back to top button